चंद्रपूर : दिवसेंदिवस बेरोजगाराची संख्या वाढत आहे. त्यामुळे बेरोजगार युवक स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून नोकरी मिळविण्यासाठी धडपडत आहे. काही दिवसापूर्वी पोलीस भरती करण्यात आली. या भरतीमध्ये जिल्ह्यासह विदर्भातील मोठ्या संख्येने बेरोजगार युवकांनी अर्ज दाखल केले. यातील काही युवकांची नियुक्ती झाली आहे. नोकरी मिळविण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या या भावी पोलिसांना सध्या फिटनेस प्रमाणपत्रासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात चकरा माराव्या लागत आहे. येथे डॉक्टरांची संख्या कमी असल्याने त्यांना केवळ आश्वासन देवून परत पाठविले जात आहे.चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी पोलीस भरती प्रक्रिया राबविली. यावेळी मोठ्या संख्येने बेरोजगार युवक या भरतीत सहभागी झाले. मात्र त्यांना राहण्याची कोणतीही व्यवस्था केली नसल्याने फुटपाथ, बसस्थानक, रेल्वे स्थानकावर त्यांनी दिवस काढून नियुक्तीपर्यंत मजल मारली. भरतीदरम्यान राज्यात काही युवकांचा मृत्यू झाल्याने प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यानंतर या उमेदवारांची पोलीस प्रशासनाने काही प्रमाणात व्यवस्था केली. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या या उमेदवारांमधून १८६ पुरुष उमेदवार तसेच ८६ महिला उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान त्यांना फिटनेस प्रमाणपत्राची मागणी करण्यात आली. यासाठी निवड झालेल्या उमेदवारांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी करणे सुरु केले. येथेही त्यांच्यावर ताटकळत राहण्याची वेळ आली. १५ जुलैपासून ते जिल्हा सामान्य रुग्णालयात चकरा मारत आहे. मात्र आज या उद्या या असे करीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर प्रमाणपत्रापासून वंचित ठेवत आहे. प्रथम नोकरी मिळविण्यासाठी जीवाचे रान करणारे उमेदवार आता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रुग्णालयात मागील सात दिवसांपासून चकरा मारत आहे.जिल्हा शल्य चिकित्सकांनी याकडे लक्ष देवून भावी पोलिसांना त्वरित प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. (नगर प्रतिनिधी)
भावी पोलिसांच्या रुग्णालयात चकरा
By admin | Published: July 21, 2014 11:47 PM