ऑनलाइन लोकमत
चंद्रूपर, दि. २१ - चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण दारुबंदीच्या निर्णयाला दारूविक्रेत्यांनी कोर्टात आव्हान द्यायचे ठरवले आहे. दारूबंदीसाठी फक्त एका जिल्ह्याला टार्गेट करून फायदा नसल्याचे सांगत पालकमंत्री सुधीर मुनगुंटीवर यांनी स्वार्थासाठी दारूबंदीचा हा निर्णय घेतल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला आहे, तसेच या निर्णयाच्या निषेधार्थ महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजेच ३० जानेवारी रोजी दारूविक्रेते मोर्चा काढणार आहेत.
चंद्रपूर जिल्ह्णात संपूर्ण दारुबंदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यातील वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्णानंतर चंद्रपूर दारुमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्णातील सर्व मद्य परवाने बंद करण्यात येतील, तसेच यापुढे मद्य सेवनासाठीचा परवाना देण्यात येणार नाही.
मात्र या निर्णयामुळे १० हजारांहून अधिक नागरिक बेरोजगार होती, तसेच पर्यटन व्यवसायावर त्याचा परिणाम होईल आणि अवैध दारूविक्री सुरू होईल अशी कारणे देत दारूविक्रेत्यांनी हा निर्णय अयोग्य असल्याचे म्हटले आहे.