लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उष्माघातामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका ‘उष्माघात कृती आराखडा - २०२१’ राबविणार आहे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी उष्णेतचा उच्चांक गाठणाऱ्या चंद्रपूर मनपा कार्यक्षेत्रात सन २०१५पासून उष्माघात कृती आराखडा चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येतो. याबाबत डॉ. आविष्कार खंडारे यांनी कृती आराखडा समितीचा आढावा घेतला.
कोविड - १९च्या पार्श्वभूमीवर मनपा आरोग्य विभागामार्फत अनेक जबाबदाऱ्या एकाच वेळेस पार पाडण्यात येत आहेत. संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना उपाययोजनांवर कार्य करत असतानाच ऐन उन्हाळ्यात नागरिक उष्माघाताला बळी पडू नयेत, यासाठी हिट ॲक्शन प्लान राबविण्यात येणार आहे. याकरिता उष्माघात कृती आराखडा सिटी लेव्हल कमिटीच्या सर्व सदस्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी डॉ. आविष्कार खंडारे यांनी सदस्यांना हिट ॲक्शन प्लानसंबंधी माहिती दिली.
या बैठकीत त्यांनी उष्माघात प्रतिबंधाबाबत व्यापक जनजागृती करणे, स्वयंसेवी संस्था व चिल्ड वॉटर असोसिएशनतर्फे पिण्याच्या पाण्याच्या पाणपोईची जागोजागी उपलब्धता करणे, १०८ रुग्णवाहिकेचा सहभाग, बांधकाम कंत्राटदारांद्वारे मजुरांच्या कामाच्या वेळेत बदल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व जनजागृतीबाबत सूचना केल्या.
यावेळी सहाय्यक आयुक्त धनंजय सरनाईक, विद्या पाटील, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. नरेंद्र जनबंधू, मनपाच्या हिट ॲक्शन प्लानशी संबंधित शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. जयश्री वाडे, डॉ. विजया खेरा, डॉ. अश्विनी भारत, डॉ. योगेश्वरी गाडगे, डॉ. नयना उत्तरवार उपस्थित होत्या.