चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. आता पुन्हा संकट वाढल्यामुळे परीक्षेविनाच विद्यार्थ्यांना पास केले जाणार आहे. असे असले तरी शाळांचा कारभार सुरू आहे. मात्र तालुकास्तरावरील शाळा तसेच शिक्षकांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या गटशिक्षणाधिकाऱ्यांचे सर्वच्या सर्व पदे रिक्त असल्यामुळे शिक्षण विभाग प्रभारींच्या भरोवश्यावर कारभार चालवित आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात १५ तालुके आहे. तालुकानिहाय एक प्रमाणे जिल्ह्यात १५ गटशिक्षणाधिकारी असणे गरजेचे आहे विशेष म्हणजे, १५ ही पदे मंजूर आहे. मात्र एकाही तालुक्यात गटशिक्षणाधिकारीच नसून त्यांचा प्रभार शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. हा प्रभारही सोपविताना काही ठिकाणी ज्येष्ठांकडे न देता काही ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याचा आरोप मध्यंतरी करण्यात आला होता. यासंदर्भात विस्तार अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाकडे निवेदनही दिले आहे. विशेष म्हणजे, दोन दोन प्रभार सांभाळताना विस्तार अधिकाऱ्यांना चांगलाच घाम सुटत आहे. विशेष म्हणजे, काही तालुक्यांमध्ये विस्तार अधिकारीही नाही. त्यांचा तसेच गटशिक्षणाधिकाऱ्यांचा पदभार अन्य अधिकाऱ्यांकडे आहे.
गट शिक्षणाधिकाऱ्यांचा प्रभार सोपविताना संबंधित अधिकारी बीएड् असणे गरजेचे आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. प्रभारींच्या भरोवशावर कामे सुरू असल्यामुळे शैक्षणिक कामे मागे पडत असून, त्याचा शिक्षण विभागावर विपरित परिणाम होत आहे. विशेष म्हणजे, यावर्षी शाळा नियमित सुरूच झाल्या नाही. परिणामी ऑनलाइन अभ्यासक्रमावर भर देण्यात आला. यात शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी विविध ऑनलाइन उपक्रमणही राबविले. स्वाध्याय, शिष्यवृत्ती अभ्यासक्रम अशा काही उपक्रमांचाही समावेश होता. मात्र हे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आवश्यक असलेले प्रयत्न कमी पडत असल्याचे चित्र मागील वर्षभरात दिसून आले.
आता पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या. पुढील सत्र केव्हा सुरू होणार हे कोरोना संकट गेल्यानंतर माहिती होणार आहे. मात्र शाळा, पटसंख्या, पुस्तक, गणवेश वितरण आदी शैक्षणिक कामे शिक्षण विभागाला करून ठेवावी लागणार आहे. मात्र महत्त्वाचे असलेले गटशिक्षणाधिकारीच पद रिक्त असल्यामुळे शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ताण पडला आहे.