बबनराव लोणीकर : जिल्हा परिषदेची स्वच्छतेवर कार्यशाळाचंद्रपूर : संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. या महान संतांचे स्वप्न साकार करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशनचा नारा दिला असून २०१९ पर्यंत महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून चंद्रपूर जिल्हा हागणदारी मुक्त करुन या मिशनची सुरुवात करण्यात येईल, असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित स्वच्छता कार्यशाळेत ते बोलत होते. बुधवारी येथे पाणी टंचाई व स्वच्छता मिशनबाबत त्यांनी आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, महापौर राखी कंचर्लावार, आ. नाना शामकुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंह, उपाध्यक्ष कल्पना बोरकर, सभापती देवराव भोंगळे, सरिता कुडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मोहिते, राजेश राठोड व युनिसेफचे राज्य समन्वयक जयंत देशपांडे उपस्थित होते.माझा महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र, सुंदर महाराष्ट्र या नुसार ५५० गावात सभा घेतल्या असून लोकांना स्वच्छतेसाठी प्रोत्साहित केल्याचे ना.लोणीकर यांनी सांगितले. महिलाच हे अभियान यशस्वी करु शकतात, असा विश्वास व्यक्त करुन ते म्हणाले, चंद्रपूर जिल्हा स्वच्छ करण्याची व हागणदारीमुक्त करण्याची मोठी जबाबदारी महिला वर्गावर आहे. चंद्रपूर जिल्हा राज्यात पायलट जिल्हा म्हणून हागणदारी मुक्त करण्यात येणार असून यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी हात धुवाविषयी प्रात्यक्षिक करुन दाखविले. (स्थानिक प्रतिनिधी)
पायलट प्रोजेक्ट म्हणून चंद्रपूर जिल्हा होणार हागणदारीमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2016 1:26 AM