चंद्रपूर: नुकत्याच पार पडलेल्या जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली. चंद्रपूर आणि राजुरा येथे भाजपसोबत केलेली हातमिळवणी वडेट्टीवार गटाच्या अंगलट आली आहे. पक्षश्रेष्ठीने याची गंभीर दखल घेत काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्यावर पदावरून कार्यमुक्त केल्याची कार्यवाही केल्याने जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. या कार्यवाहीने खासदार बाळू धानोरकर यांच्या गटात आनंदाचे वातावरण असल्याची आतील गोटातील माहिती आहे. ही कार्यवाही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसे पत्र प्रकाश देतवळे आणि शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांना प्राप्त झाले आहे.
पत्रानुसार, लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या आदानी समुहातील महाघोटाळ्यासंदर्भात नेते राहुल गांधी यांनी उठविलेला आवाज भाजपाने हुकुमशाही पध्दतीने दडपण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी भाजपा विरोधात थेट संघर्ष करत असताना भाजपाशी कोणत्याही पध्दतीची हातमिळवणी करणे अयोग्य आहे, याकडे लक्ष वेधले गेले. या अनुषंगाने स्थानिक पातळीवरील कोणत्याही निवडणुकीमध्ये भाजप किंवा त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी असलेल्या कोणत्याही पक्षासोबत आघाडी करू नये, अशा स्पष्ट सूचना प्रदेश कार्यालयाकडून देण्यात आल्या होत्या.
तरी देखील नुकत्याच पार पडलेल्या चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उघड उघड भाजपसोबत हातमिळवणी करून प्रत्यक्ष सहभाग घेतला, ही बाब पक्षशिस्तीच्या विरोधातली असून प्रदेश काँग्रेसच्या आदेशाला न जुमानणारी आहे. हे कृत्य पक्षविरोधी असल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे, असेही नमुद केलेले आहे. त्यामुळे प्रकाश देवतळे यांना चंद्रपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरून कार्यमुक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पदाचा प्रभार पुढील आदेशापर्यंत चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष रामू तिवारी यांच्याकडे सोपविण्यात येत आहे, असेही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.
काँग्रेसमधील गटबाजी उघड
चंद्रपूर जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. चंद्रपूर आणि राजुरा बाजार समितीमध्ये काँग्रेसने भाजपशी हातमिळवणी करून ही निवडणूक लढली आणि जिंकली. या निवडणुकीच्या निकालानंतर खासदार बाळू धानोरकर यांनी वडेट्टीवार यांना थेट आव्हान दिल्याचे व्हिडिओदेखील काही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना पदावरून कार्यमुक्त करण्यात आले. देवतळे हे वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक आहेत. या कार्यवाहीवर माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार काय भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागले आहे. एकूणच घडमोडींवरून चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये उघडपणे दोन गट पडल्याचे बोलले जात आहे.