चंद्रपूर : सन २०२०-२०२१ या वर्षाची जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली. या पैसेवारीत जिल्हा दुष्काळाच्या छायेत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील १७८८ गावातील पैसेवारी ४८ टक्के आली आहे. मात्र शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई जाहीर झाली नसल्याने मदतीची प्रतीक्षा आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण गावांची संख्या १८३६ आहे. त्यापैकी खरीप गावांची संख्या १८३३ तर रबी गावांची संख्या ३ आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पीक नसलेल्या गावांची संख्या ४५ आहे. जिल्ह्याची पीक परिस्थिती जाणून घेण्यासाठी पैसेवारीचा आधार घेतला जातो. ही पैसेवारी महसुलाची यंत्रणा जाहीर करते. त्यावरच शासनाचे धोरण ठरवले जाते. महसुलाच्या ठोकताळ्यानुसार ५० टक्क्यांच्या आतमध्ये पैसेवारी असेल, तर जिल्हा किंवा गाव दुष्काळग्रस्त समजण्यात येते.
३१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी अंतिम पैसेवारी जाहीर केली. त्यामध्ये बहुतांश तालुक्यातील पैसेवारी ही ५० पैशाहून कमी आहे. जिल्ह्यातील १७८८ गावांतील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ४८ पैसे आहे तर ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या १५११ आहे. ५० पेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या गावांची संख्या ४५ आहे. केवळ मूल, पोंभुर्णा, गोंडपिपरी तालुक्याची पैसेवारी ५० आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली नसल्याने शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
बॉक्स
यांना मिळतो लाभ
ज्या गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत आहे. त्यांना शेतसाऱ्यामध्ये सुट मिळते. वीजबिलात ३० टक्के कपात, शैक्षणिक शुल्क माफ करण्यात येते. कर्जवसुलीची सक्ती नसते. अशा सवलती दिल्या जातात.