राजेश भोजेकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कारखान्यांच्या राक्षसी प्रदूषणाने आधीच आजारी असलेला चंद्रपूर जिल्हा आता सूर्याच्या आगीने होरपळत आहे. यंदा ३० मार्चपासूनच सूर्य आग ओकू लागला. गेल्या ४७ दिवसांपासून सूर्याचा पारा ४४ ते ४७ अंशाच्या खाली उतरायला तयार नाही. मे महिना अजून संपलेला नाही. या आगीने चंद्रपूर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून जगणेही असह्य झाले आहे. दुपारी सर्वत्र संचारबंदी सदृश स्थिती बघायला मिळत आहे.चंद्रपूर जिल्हा विपुल खनिज संपत्ती आणि वनसंपदेने नटलेला असला तरी हीच खनिज संपत्ती आता चंद्रपूरकरांवरच उठली आहे. या खनिज संपत्तीची लयलुट करण्यासाठी जिल्ह्यात हजारांच्या घरात कारखाने थाटलेले आहे. या कारखान्यातून निघणारी उष्णता चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात मोठी भर घालत आहे. यंदा सूर्य तापायला लागल्यानंतर विदर्भात त्यांच्या झळा सर्वाधिक बसू लागल्या. सुरुवातीला विदर्भातील अकोला जिल्ह्याचा पारा सर्वाधिक होता. यानंतर अन्य जिल्हेही तापायला लागले. नंतर अन्य जिल्ह्यांचे तापमान कमी होत असताना चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान मात्र वाढताना दिसत आहे. ३० मार्चपासून चंद्रपूर जिल्ह्यातील तापमानावर लक्ष टाकल्यास चंद्रपूर जिल्ह्यात अक्षरश: सूर्य आगच ओकत असल्याचे दिसून येते.सकाळी ८ वाजतापासूनच उन्हाच्या झळा बसायला सुरुवात होते. दिवसा नागरिकांचे घराबाहेर पडणे बंद पडले आहे. अतिमहत्त्वाच्या कामानिमित्तच चंद्रपूरकर घराबाहेर पडताना दिसून येत आहे. नोकरदार वर्ग कार्यालयातच बसून राहणे पसंत करीत आहेत. नेहमी दिवसभर गजबजून असलेले शहराचे रस्ते दुपारी मोकळे दिसायला लागले आहे. मुख्य रस्त्यांवर नाममात्र माणसे दिसतात. शहरात संचारबंदी लागल्यागत स्थिती निर्माण झाली आहे.४ दिवस पारा ४५ अंशावर३१ मार्चला ४४.२ अं.से. तापमानाची नोंद झाली. यानंतर पारा ४१ अंशाच्या खाली उतरलाच नाही. ३० मार्च ते १६ मे या ४७ दिवसांतील तापमानावर दृष्टी टाकल्यास तब्बल १४ दिवस पारा ४५ अंशावर होता. ८ दिवस ४६ अंशावर होता. तर २ दिवस ४७ अंशावर होता. ६ दिवस ४३ अंशावर आणि केवळ ५ दिवस ४३ अंशावर होता. अन्य केवळ १२ दिवस तो ४१ ते ४२ अंशावर होता. मे महिना संपायला अजून दोन आठवडे शिल्लक आहेत. यंदा मान्सून वेळेवरच दाखल होईल, हा हवामान विभागाचा अंदाज असला तरी तो दरवर्षी खरा ठरणार याची शाश्वती नाही. मान्सून वेळेवर दाखल न झालस या कालावधीतही चंद्रपूर जिल्ह्याला सूर्याची आग सोसावी लागणार आहे.
बळीराजा भर उन्हात राबतोय
खरीपाचा हंगाम तोंडावर आहे. यंदा मान्सून वेळेत येण्याचे भाकीत हवामान खात्याने वर्तविल्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. उन्हाची तमा न बाळगता तो पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतावर राबताना दिसत आहे.
३३ कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्व वाढलेराज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीचा विडा उचलला तो उगीच नाही. टिका करणे सोपे आहे. शंभर टक्के वृक्ष जगण्याची हमी टिका करणारेही देऊ शकत नाही. जे वृक्ष जगले ते पर्यावरणाच्या दृष्टीने फायद्याचेच आहे. भविष्यातील धोके टाळण्यासाठी वनमंत्र्यांनी टाकलेले सकारात्मक पाऊल चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येकाला आता टाकावे लागणार आहे.
पर्यावरणवाद्यांना सोशल मीडियाची मर्यादाअदानी प्रकल्पाला विरोध करून चंद्रपूरातून हाकलून लावणारे पर्यावरणवादी आता नावाने मोठे झाले आहे. ते स्वत:ला तज्ज्ञ मानायला लागले असून ते सतत सोशल मिडियावरच विचार मांडताना दिसून येत आहे. जिल्ह्यात सूर्य आग ओकत असताना अपवाद वगळता याबाबत ते ब्र देखील काढताना ते दिसत नाही.
३० मार्च ते १६ मेपर्यंतचे चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान४५ अंश - १४ दिवस४६ अंश - ८ दिवस४७ अंश - २ दिवस४४ अंश - ६ दिवस४३ अंश - ५ दिवस४१ ते ४२ अंश - १२ दिवस