लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्याचे अर्थ, नियोजन व वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्यभरात १३ कोटी वृक्ष लागवडीचे आवाहन केले होते. या मोहीमेत त्यांच्या चंद्रपूर या गृह जिल्ह्याने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी ६ वाजतापर्यंत ६९ लाख ८४ हजार ४२१ इतकी विक्रमी वृक्ष लागवड झाल्याची नोंद झाली. ही नोंद राज्यात तिसऱ्या क्रमांकाची ठरली आहे.राज्याचे वनमंत्री ना. मुनगंटीवार यांनी गेल्या तीन वषार्पासून वृक्षलागवडीचा विक्रम राज्यात केला आहे. पहिल्या वर्षी २ कोटी, दुसऱ्या वर्षी ४ कोटी तर तिसऱ्या वर्षी १३ कोटी वृक्षलागवडीचे आवाहन त्यांनी केले होते. या मोहिमेला यावर्षी सर्वाधिक प्रतिसाद नांदेड जिल्ह्याने दिला आहे. त्या पाठोपाठ मागील वर्षी पहिल्या क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्ह्याचा क्रमांक येतो. ३१ दिवसांमध्ये सर्वाधिक वृक्षलागवडीची नोंद ५ जुलैला करण्यात आली. जिल्हयात या दिवशी ४ लाख ८९ हजार १०२ वृक्षलागवड झाली होती.राज्यात १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीमध्ये १३ कोटी वृक्ष लागवडीचे आवाहन करण्यात आले होते. तथापि, चार दिवस आधीच ही वृक्षलागवड १३ कोटींच्यावर गेली. राज्यामध्ये दुपारी ४ वाजतापर्यंत १४ कोटी ७१ लाखांवर वृक्षलागवड करण्यात आल्याचे जाहिर केले. यामध्ये चंद्रपूरचा देखील मोठा हातभार असल्याचे समाधान जिल्हा प्रशासनाने व्यक्त केले असून सहभागी सर्व यंत्रणांचे आभार व्यक्त मानले आहे.चंद्रपूर जिल्ह्यात विभागवार वृक्ष लागवड३१ दिवसात वनविभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार वनविभागाने ३१ जुलैपर्यंत ३१ लाख १० हजार ३७५ वृक्षलागवड केली आहे. त्यापाठोपाठ वनविकास महामंडळाने १४ लाख ५१ हजार ३८ वृक्षलागवड केली आहे. चंद्रपूर जिल्हयातील अन्य विभागांमध्ये ग्रामपंचायतीमार्फत ९ लाख ८५ हजार वृक्षलागवड केली आहे. सामाजिक वनीकरण विभागामार्फत ३ लाख ६६ हजार ३२४ वृक्ष लावले आहे. शैक्षणिक संस्थांनी १ लाख ४२ हजार, कृषी विभागाने २ लाख ४९ हजार वृक्षलागवड केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने १ लाख १४ हजार, नगर विकास विभागाने १ लाख २१ हजार वृक्षलागवड करुन उल्लेखनीय कार्य केले आहे.