टेमुर्डा (चंद्रपूर) : उदरनिर्वाहासाठी आलेल्या भटक्या जमातीच्या कुटुुंबातील तीन घोडे वरोरा तालुक्यातील टेमुर्डा शिवारात चरत असताना वाघाने हल्ला चढवून एका घोड्याला ठार केले. ही घटना गुरूवारी रात्री घडली. ही बाब माहिती होताच गावकऱ्यांनी फटाके उडविल्याने वाघाने जंगलात धूम ठोकली. वाघाच्या हल्ल्यात घोडा ठार झाल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.
टेमुर्डा येथील काही दिवसांपासून भटक्या जमातीचा तांडा वस्ती करून आहे. त्यांच्याकडे काही घोडे आहेत. त्यातील तीन घोडे अण्णाजी महादेव गाते यांच्या शिवारात चरत होते. या परिसराला लागूनच जंगल आहे. त्यामुळे वाघ-बिबट व अन्य वन्यप्राण्यांचा सतत संचार सुरू असतो. येथील चंद्रभान तिखट यांच्या शेतीला लागूनच घनदाट जंगल असल्याने वाघाचे बस्तान असते. भटक्या जमातीचे तीन घोडे गुरूवारी रात्री उशिरापर्यंत चरत होते. दरम्यान, वाघाने या घोड्यांवर हल्ला चढविला. यामध्ये एक घोडा जागीच ठार झाला. अन्य दोन घोडे जीवाच्या आकांताने तांड्यावर आले. पहिल्यांदाच असा प्रकार घडला. घोडेमालकाने गावकऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. त्याठिकाणी एक घोडा ठार झाल्याचे दिसून आले. हल्ला केल्यानंतर त्याच परिसरात वाघाचे बस्तान असल्याची शंका आली. गावकऱ्यांनी फटाके उडवून वाघाला पिटाळले. या घटनेची माहिती वन विभागाने दिल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी गुरूवारी पंचनामा केला.
कोट
टेमुर्डा वन परिक्षेत्रात वाघाचा संचार आहे. वाघाच्या हल्ल्यात घोडा ठार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पंचनामा करण्यात आला. वरिष्ठांच्या सुचनेनुसार वाघाचा बंदोबस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी या परिसरात संचार करताना काळजी घ्यावी.
- व्ही. पी. उराडे, वनपाल उपवन परिक्षेत्र, टेमुर्डा