लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. ४ च्या एका शिक्षिकेने शाळेतीलच सहाय्यक शिक्षकाविरुद्ध विनयभंगाची तक्रार केली. सदर शिक्षकाने ही तक्रार खोटी असल्याचा दावा न्यायालयात केला. न्यायालयात तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून फिर्यादी शिक्षिका, तपास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यासह नऊ जणांविरुद्ध ब्रह्मपुरी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. विनयभंगाची तक्रार अंगलट आल्याच्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहेआरोपींमध्ये तपास अधिकारी आर. एस. खैरकर, पं. स. विस्तार अधिकारी प्रदीप उपलंचीवार, जि.प. महिला समितीच्या अध्यक्ष पुष्पा आत्राम, समितीचे सचिव शालिक माटूलीकर, कक्ष अधिकारी कांचन वरठी, अधीक्षक अरूण गतमने, पर्यवेक्षिका रेखा वनकर, आरोग्य परिचारिका छाया पाटील व फिर्यादी शालीनी चौधरी यांचा समावेश आहे.सदर शिक्षिकेने १६ नोव्हेंबर २०११ आणि ५ आॅगस्ट २०१५ ला त्याच शाळेतील सहाय्यक शिक्षक जयदास सांगोडे यांच्याविरुद्ध ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार केली होती. पोलिसांनी सांगोडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तक्रारीत नमूद तारखेला आपण शाळेतच नव्हतो. अन्यत्र कर्तव्य बजावत होतो. ही बाब विचारात घेऊन सांगोडे यांनी ब्रह्मपुरी येथील न्यायदंडाधिकारी (प्रथम श्रेणी) यांच्या न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल करून न्याय मागितला.या अर्जावर झालेल्या सुनावणीमध्ये कोणतीही शहानिशा न करता सांगोडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची बाब निष्पन्न झाली. या अनुषंगाने न्यायालयाने दि.२६ जुलै २०१८ रोजी आदेश पारित करून खोटा, बनावटी व चुकीचा आलेख तयार केल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश पारित केला.या आदेशावरून ब्रह्मपुरी ठाण्यातील सदर प्रकरणाचा तपास अधिकारी आर. एस. खैरकरविरुद्ध पं. स. विस्तार अधिकारी प्रदीप उपलंचीवारविरुद्ध आणि जि.प. महिला समितीच्या अध्यक्ष पुष्पा आत्राम, समितीचे सचिव शालिक माटुलीकर, कक्ष अधिकारी कांचन वरठी, अधीक्षक अरूण गतमने, पर्यवेक्षिका रेखा वनकर, आरोग्य परिचारिका छाया पाटील व शालिनी चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास ब्रह्मपुरीचे ठाणेदार दीपक खोब्रागडे करीत आहेत.
चंद्रपूर : विनयभंगाची खोटी तक्रार शिक्षिकेसह नऊ जणांच्या अंगलट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:27 PM
चंद्रपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. ४ च्या एका शिक्षिकेने शाळेतीलच सहाय्यक शिक्षकाविरुद्ध विनयभंगाची तक्रार केली. न्यायालयात ही तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाले.
ठळक मुद्दे जि.प.शाळेतील प्रकरण न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल