चंद्रपूर : मराठा सेवा संघ चंद्रपूरद्वारा शिवजयंती महोत्सव व जाहीर व्याख्यान समारंभ आयोजित केला जातो. १९ फेब्रुवारी हा शिवजन्मोत्सवाचा दिवस मराठा सेवा संघाच्या वतीने लोकोत्सव म्हणून साजरा केला जातो. याच कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण इत्यादी क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांना चंद्रपूर गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यावर्षी हा पुरस्कार इको प्रो संस्था चंद्रपूरचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर येथे मराठा सेवा संघ चंद्रपूर द्वारा आयोजित केली आहे. शिवजयंती महोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा उद्योजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष कुचनकार, उद्घाटक रणरागिणी महिला नागरी सहकारी पतसंस्था बाबूपेठ चंद्रपूरच्या अध्यक्षा चंदा वैरागडे, प्रमुख व्याख्याता जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा सीमा बोके असून प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघ महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष दीपक जेऊरकर, मराठा सेवा संघ चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष दीपक खामनकर आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे.