रवी जवळे चंद्रपूरचंद्रपूर महानगरपालिकेत मागील काही महिन्यांपासून कचरा संकलनाच्या कंत्राटावरून चांगलाच वाद पेटला आहे. या भांडणात मनपा प्रशासन व पदाधिकाऱ्यांना मूळ शहर स्वच्छतेचाच विसर पडल्याचे दिसून येते. घराघरातून कचरा संकलन करणे तर दूर रस्त्यांवरील कचराही नीट उचलला जात नसल्याने शहर स्वच्छतेचे धिंडवडे निघाले आहेत. कचरा पेट्या तुंबलेल्या, नाल्यांमध्ये घाणीचे साम्राज्य, रस्त्याच्या कडेला साचून असलेला केरकचरा, यामुळे चंद्रपूर शहरच डासांचे उत्पत्ती केंद्र झाले आहे. शहरभर डासांचे थैमान असतानाही मनपाला औषध, धूर फवारणी करावीशी वाटू नये, ही बाब संताप अनावर करणारी आहे.चंद्रपूरला नगरपालिका असतानाही स्वच्छतेबाबत हे प्रशासन कधीही गंभीर वाटले नाही. नगरपालिका होती, तेव्हापासून असलेल्या शहरातील घाणीचे साम्राज्य महानगरपालिका झाल्यानंतरही कमी होऊ शकले नाही. चंद्रपुरात महानगरपालिका झाल्यानंतर ‘स्वच्छ शहर सुंदर शहर’ ही संकल्पना पूर्णत्वास येईल, अशी सर्वांना आशा होती. त्या दृष्टीने कामेही सुरू झाली. भूमिगत मलनिस्सारण योजनेला मंजुरी देत महानगरपालिकेने या योजनेच्या कामाला सुरूवातही केली. त्यानंतर शहरातील कचरा डम्पींग यार्डवर टाकण्याचे कंत्राट नागपूर येथील कंपनीला दिले. या कंपनीने महानगरपालिकेला केलेल्या कराराप्रमाणे कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी नवीन वाहनेही चंद्रपुरात आणली. प्रारंभी अतिशय गांभीर्याने शहरातील कचरा उचलला जाऊ लागला. मात्र त्यानंतर यात अनियमिता दिसू लागली आणि शहरात घाणीचे साम्राज्य दृष्टीस पडू लागले. त्यानंतर नवी युक्ती काढत मनपाने घराघरातून कचरा संकलन करण्याचे नवीन टेंडर काढले. नागपूर येथील त्याच कंपनीला हे आणखी वेगळे टेंडर देण्यात आले. यावरून सध्या महानगरपालिकेत अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक यांच्यामध्ये खडाजंगी उडाली आहे. मागील अनेक दिवसांपासून हा वाद सुरू आहे. या वादात शहरातील कचरा उचलण्याकडेही दुर्लक्ष झाले आहे. सध्या ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. कचरा कुंड्या तुडूंब भरून असतानाही त्यातील कचरा काढून डम्पींग यार्डवर टाकला जात नाही. याशिवाय नाल्यांमधील गाळही साफ केला जात नाही. त्यामुळे सध्या चंद्रपूर शहरात डासांचा हैदोस प्रचंड वाढला आहे. प्रत्येक वार्डातील नागरिक सध्या डासांमुळे हैराण झाले आहेत. तरीही महानगरपालिका प्रशासनाला याचे काही सोयरसूतक असल्याचे वाटत नाही. त्यामुळे चंद्रपुरात डेंग्यू, मलेरियासारखे साथीचे आजार पसरण्याची भीती आहे.
चंद्रपूर झाले डास उत्पत्ती केंद्र
By admin | Published: July 10, 2015 1:31 AM