- राजेश भोजेकर
चंद्रपूर - राजकारणात एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस खासदार बाळू धानोरकर, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर व काँग्रेसचे राजुराचे आमदार सुभाष धोटे एकाच मंचावर एकत्र आले आणि गप्पांच्या मैफिली रंगले. यावेळी तिघांमध्ये हास्याचे फवारे उडाले. हा दुर्मिळ योग बल्लारपूर येथे जुळून आला.
या जिल्ह्यात काँग्रेस व भाजपा नेहमीच एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहिले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून या जिल्ह्यात राजकीय लढाई ही या दोन पक्षांतच होत आली आहे. आता तर बाजार समितीच्या निवडणुकीत चंद्रपूरकरानी या दोन प्रतिस्पर्धी पक्षाची युतीही बघितली आहे. मात्र केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर व बाळू धानोरकर या दोन नेत्यांचे राजकीय काहीसे तणावपूर्ण राहिले.
धानोरकर शिवसेना आमदार असतानादेखील संबंधातील हा तणाव होताच. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर - अहिर अशी थेट लढाई झाली. यात धानोरकर यांनी बाजी मारली. त्यानंतरही एक दोन कार्यक्रमात अहिर व धानोरकर यांनी एकमेकांवर सरळ टीका केली. राजकारणातील ही टीका सुरू असताना व्यक्तिगत पातळीवर संबंधात कटुता निर्माण होऊ दिली नाही. याचा प्रत्यय बल्लारपूर मनोरंजन केंद्र वेकोलि येथे ७५ प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे पत्र वितरण कार्यक्रमात आला. धानोरकर - अहिर व धोटे हे तिन्ही नेते या कार्यक्रमात एकत्र आले. एकाच मंचावर एकमेकांच्या बाजूला बसले. यावेळी या तिन्ही नेत्यांनी हास्य, विनोद, राजकारण तसेच विविध विषयांवर चर्चा केली. या तिन्ही नेत्यांचे मंचावरील वागणे बघितले तर जणू काही एकमेकांचे प्रतिस्पर्धी नाहीच असं चित्र दिसत होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात खासदार धानोरकर व माजी केंद्रीय मंत्री अहिर यांनी वेकोली प्रकल्पग्रस्तांचा विषय आपणच मार्गी लावला हे श्रेय घेण्यास दोन्ही नेते विसरले नाही.
प्रदीर्घ लढा, ऐक्य व संघर्षापोटीच प्रकल्पग्रस्तांना सन्मानजनक नोकऱ्या व भरीव मोबदला मिळाला, असे अहीर म्हणाले. भूमिपुत्रांना चंद्रपुरात नोकरी द्या असे धानोरकर म्हणाले. अवघ्या एक वर्षावर लोकसभा निवडणुकी आलेली आहे. अशात काँग्रेसचे खासदार धानोरकर व माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री अहिर या दोन्ही नेत्यांनी एकाच मंचावर येत एक प्रकारे जनसंपर्क अभियानदेखील सुरू केले आहे.