वरोरा (चंद्रपूर) : वरोरा तहसील कार्यालयात अनेक प्रकरणांत वकील मंडळी नागरिकांच्या वतीने बाजू मांडत असतात, तेव्हा वकिलांना वरोरा तहसीलदार सभ्यपणाची वागणूक देत नाही, अशा तक्रारी वकिलांनी अधिवक्ता संघाकडे केल्या. वरोरा अधिवक्ता संघाने सभा घेऊन एक ठराव घेतला. त्यात जोपर्यंत संबंधित तहसीलदार कार्यरत आहे, तोपर्यंत तहसील प्रशासनाच्या कोणत्याही केसेस वकील घेणार नाहीत. मागील दहा दिवसांपासून हा बहिष्कार सुरू असून महसूल संबंधातील अनेक प्रकरणे प्रलंबित झाली आहे.
ॲड. शरद कारेकार हे तहसीलदार यांच्या कार्यालयात पक्षकाराच्या वतीने बाजू मांडण्याकरिता गेले असता तहसीलदार कक्षात वकिलांना बसण्याकरिता खुर्चीही नाही. त्यामुळे उभे राहावे लागते. वकिलांना उभे ठेवून तहसीलदार दुसरे काम करीत असतात. पक्षकाराचे नुकसान होऊ नये म्हणून वकील मंडळी निमूटपणे हे सर्व सहन करतात, असे कारेकार यांनीच तक्रारीत म्हटले आहे.
तहसील न्यायालयाचे कामकाज दुपारी तीन वाजेनंतर सुरू होते. त्यामुळे वकील मंडळींना ताटकळत वाट बसावे लागते. महसूल न्यायालयीन कामकाज सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत ठेवण्यात यावे, जेणेकरून सर्व न्यायालयीन कामे करणे सुलभ होईल, अशी वकिलांची मागणी आहे. याबाबत ॲड. शरद कारेकार यांनी वरोरा अधिवक्ता संघाकडे तक्रार केल्यानंतर लगेच बैठक घेण्यात आली. वरोरा तहसीलदार यांच्याकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीबाबत बहुसंख्य वकील मंडळींनी आपले गाऱ्हाणे बैठकीत मांडले.
जोपर्यंत संबंधित तहसीलदारांचे स्थानांतरण होत नाही, तोपर्यंत त्यांच्या न्यायालयात वकील मंडळी काम करणार नाही, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यामुळे मागील दहा दिवसांपासून वरोरा वकिलांचा तहसील न्यायालयात बहिष्कार सुरू असून अनेक प्रकरणे प्रलंबित पडली आहेत.