Chandrapur Lok Sabha Results 2024 :चंद्रपूर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झाला. पहिल्या फेरीपासूनच ते पिछाडीवर होते. त्यामुळे भाजपा गोटामध्ये सकाळपासून शांतता असल्याचे दिसून आले. भाजपच्या गिरणार चौक परिसरातील कार्यालयात तसेच उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या घरीही शुकशुकाट होता. एरवी या दोन्ही ठिकाणी चहल-पहल असते. मात्र मंगळवारी दिवसभर एकदम शांत वातावरण होते. सुरक्षेच्या दृष्टीने मुनगंटीवार त्यांच्या घरासमोर पोलिसांनी सायंकाळच्या वेळी बॅरिकेट लावले होते.
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये एक्झिट पोलनुसार काँग्रेस उमेदवार विजयी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देताना एक्झिट पोलचा अंदाज चुकतो, विजय आपलाच असल्याचे सांगून कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला. मात्र मंगळवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर पोस्टल बॅलेटच्या फेरीपासूनच सुधीर मुनगंटीवार हे मागे पडत गेले. हा मागे पडण्याचा क्रम शेवटच्या फेरीपर्यंत सुरूच होता. त्यामुळे मतदान केंद्रामध्ये सकाळी एकत्र आलेले भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते सकाळी ११ नंतर घराकडे जायला लागले होते. त्यानंतर दुपारी २ वाजेपर्यंतही मुनगंटीवार यांनी आघाडीच घेतली नसल्याने अनेकांनी मतमोजणी केंद्र सोडून घरी जाणे पसंत केले. दरम्यान, गिरणार चौक येथे असलेले भाजप कार्यालय तसेच सुधीर मुनगंटीवार यांच्या घरीसुद्धा शुकशुकाट बघायला मिळाला.