Chandrapur Lok Sabha Results 2024 : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पाच फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर 61 हजार 760 मतांनी आघाडीवर आहे. पाचव्या फेऱ्यांअंती त्यांना एकूण 1 हजार 46 हजार 272, तर भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना 84 हजार 512 मते मिळाली.
चंद्रपूर मध्येसहा विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. यामध्ये चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, वरोरा, वणी आणि आर्णी विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहे. तर बल्लारशाह विधानसभा क्षेत्राचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे महायुतीचे उमेदवार आहे. यासह वंचित बहुजन आघाडीकडून राजेश बेले यांनीही निवडणूक लढविली आहे.२०१९ च्या निवडणुकीमध्ये चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात बाळू धानोरकर हे काँग्रेसचे महाराष्ट्रातून एकमेव खासदार निवडून आले होते. मात्र, दुर्दैवाने त्यांचे निधन झाले.
२०२४ ची निवडणूक भाजप आणि काँग्रेसनेही प्रतिष्ठेची केली. प्रचारासाठी दिग्गजांनी हजेरी लावली. प्रतिभा धानाेरकर यांनी आघाडी घेतल्याने मतदारसंघात जल्लाेष सुरू झाला आहे.
चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये एकूण १५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये खरी लढत भाजपा आणि काँग्रेसमध्ये झाली. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीच्या निकालाकडे चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
२०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर हे निवडून आले होते. ते महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार होते. तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा त्यांनी पराभव केला. बाळू धानोरकर यांना ५ लाख ५९ हजार ५०७ तर हंसराज अहीर यांना ५ लाख १४ हजार ७४४, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेंद्र महाडोळे यांना १ लाख १२ हजार ७९ मते मिळाली होती. या निवडणुकीमध्ये १३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ११ हजार ३७७ मतदारांनी नोटाला पसंती दिली. विशेष म्हणजे, बाळू धानोरकर हे वरोरा विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार होते. त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि उमेदवारीही मिळविली होती. मात्र, दुर्दैवाने त्यांचे मागील वर्षी निधन झाले. त्यानंतर पोटनिवडणुकीचीही चर्चा रंगली होती. भाजपचे हंसराज अहीर यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे चार वेळा नेतृत्व केले.