परिमल डोहणे, चंद्रपूर Chandrapur Lok Sabha Results 2024 : पोस्टल मताच्या मोजणीपासून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी आघाडी घेतली. दरम्यान सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर होते. सहाव्या फेरीत लाखांच्या जवळपास आघाडी घेताच महिला काँग्रेसने गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी डीजेच्या तालावर महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठेका धरून एकमेकांना गुलाल लावला.
निवडणूक झाल्यापासून चंद्रपुरातील निवडणूक अत्यंत अटीतटीची होईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र मतमोजणीला सुरुवात होताच हा कयास खोटा ठरला. पोस्टल मताच्या मोजणीपासून प्रतीभा धानोरकर यांनी आघाडी घेतली होती. सहाव्या फेरीतच लाखाच्या जवळपास लीड जाताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फटाके फोडून जल्लोष साजरा करत होत्या. दरम्यान बाबूपेठ येथे महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष चंदा वैरागडे यांच्या नेतृत्वात गुलाल उधळण्यात आला. एवढेच नाही तर डीजेच्या तालावर महिला कार्यकर्त्यांनी ठेका धरला. एकमेकांना गुलाल लावून आनंदोत्सव साजरा केला होता.
२०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर हे निवडून आले होते. ते महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार होते. तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा त्यांनी पराभव केला. बाळू धानोरकर यांना ५ लाख ५९ हजार ५०७ तर हंसराज अहीर यांना ५ लाख १४ हजार ७४४, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेंद्र महाडोळे यांना १ लाख १२ हजार ७९ मते मिळाली होती. या निवडणुकीमध्ये १३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ११ हजार ३७७ मतदारांनी नोटाला पसंती दिली. विशेष म्हणजे, बाळू धानोरकर हे वरोरा विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार होते. त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि उमेदवारीही मिळविली होती. मात्र, दुर्दैवाने त्यांचे मागील वर्षी निधन झाले. त्यानंतर पोटनिवडणुकीचीही चर्चा रंगली होती. भाजपचे हंसराज अहीर यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे चार वेळा नेतृत्व केले.