ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : तालुक्यातील जंगलव्याप्त भागातील आवळगाव-हळदा परिसरात धुमाकूळ घालून तिघांना ठार करून अनेक पाळीव जनावरांची शिकार करणाऱ्या वाघास जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
वरिष्ठ स्तरावरून के-४ (नर) या सुुमारे अडीच वर्षीय वाघाला पकडण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने वनविभागाने पाळत ठेवून सोमवारी सायंकाळी ६.४५ वाजता डार्ट करून वाघाला बेशुद्ध करीत पिंजराबंद केले.
ब्रह्मपुरी वनविभागातील दक्षिण पुरी वनपरिक्षेत्रातील आवळगाव उपक्षेत्रांतर्गत शेतशिवारात धुमाकूळ घालत असलेल्या या वाघास जेरबंद करण्याचे मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान वनरक्षक (वन्यजीव) म. रा. नागपूर यांचे २५ ऑक्टोबर रोजीचे आदेश होते. त्या अनुषंगाने सोमवारी डॉ. रविकांत खोब्रागडे पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव), अजय मराठे सशस्त्र पोलिस यांनी या वाघाला अचूक निशाणा साधून डार्ट करून बेशुद्ध केले.
सायंकाळी ७.२२ वाजता पिंजराबंद केले. ही कारवाई के. आर. घोंडणे, आर. डी. शेंडे, वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली. वाघाला पुढील तपासणीकरिता ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर, चंद्रपूर येथे स्थानांतरित करण्यात आले आहे.