महाराष्ट्रातील चंद्रपुरात एका आईनं चक्क आपल्या तीन वर्षांच्या मुलीला मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढलं. तिनं बिबट्याच्या तोंडून आपल्या मुलीला वाचवलं. ही घटना दुर्गापूर परिसरात घडली. या घटनेनंतर संतप्त लोकांनी वनविभागाच्या १० कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवलं. लोकांनी त्या बिबट्याला ठार मारण्याची मागणी केली होती.
मुलगी रात्री ९ वाजता आपल्या घरातील अंगणात बसून जेवत होती. तेव्हा अचानक समोरून बिबट्यानं हल्ला केला आणि तो तिला घेऊन जाऊ लागला. हे पाहताच मुलीच्या आईनं हाती मोठा दांडा घेतला आणि बिबट्या मागे धाव घेतली. त्यानंतर तिनं दांड्यानं बिबट्यावर वार केला आणि यानंतर त्यानं मुलीला सोडलं.
बिबट्या पुन्हा त्या मुलीकडे जात होता, तेव्हा त्या चिमुरडीच्या आईनं पुन्हा त्याच्यावर वार केला आणि त्यानंतर बिबट्या त्या ठिकाणाहून पळून गेला. यात मुलीचे प्राण वाचले असले तरी ती गंभीररित्या जखमी झाली आहे. तिला या घटनेनंतर त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
“माझी मुलगी अंगणात जेवत बसली होती होती. मी जेव्हा आतून बाहेर आले तेव्हा बिबट्या माझ्या मुलीला घेऊन जाताना पाहिलं. मी काहीही विचार न करता बिबट्यावर दांड्यानं हल्ला केला. त्यानंतर बिबट्यानं मुलीला सोडलं. तो पुन्हा तिला नेण्याच्या तयारीत होता, तेव्हा मी त्याच्यावर पुन्हा दांड्यानं वार केला आणि तो तिथून पळून गेला,” अशी माहिती चिमुरडीची आई ज्योती पुप्पलवार यांनी दिली.
बिबट्याला मारण्याची मागणीबिबट्याला पकडून मारण्यासाठी यापूर्वी अनेकदा आंदोलन करण्यात आलं आहे. मोर्चेही काढण्यात आले आहे. वन विभागाच्या कार्यालयात तोडफोडही झाली. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. यामुळे लोकांना संताप आला आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवलं, अशी प्रतिक्रिया स्थानिक नेते रामपाल सिंघ यांनी दिली.