लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : एकीकडे कोरोनाचे संकट हाताळण्यासाठी निधी नसल्याची ओरड करणाऱ्या मनपाने दुसरीकडे निधीची उधळपट्टी सुरू केली आहे. मनपाने महापौरांसाठी गरज नसताना नवे वाहन खरेदी केले. केले तर केले, हा प्रकार इथपर्यंतच थांबला नाही, तर मनपा प्रशासनाने या वाहनावर आरटीओच्या व्हीआयपी क्रमांकासाठी तब्बल ७० हजार रुपये मोजले आहे. नवे वाहन खरेदी करण्यासाठी आणि त्यावर ७० हजार रुपयांच्या व्हीआयपी क्रमांकासाठी निधी कुठून आला, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेने २४ फेब्रुवारी २०२१ रोजी एक्सएल एल्फा नेक्सा कंपनीचे वाहन खरेदीसाठी ११ लाख १८ हजार १६८ रुपये मंजूर केले. हे वाहन महापौरांसाठी वापरण्यात येणार असल्याने या वाहनाकरिता एचएच ३४ बीव्ही ११११ या व्हीआयपी क्रमांकाकरिता ७० हजार रुपये आगाऊ मोजले आहे. वाहनाची मूळ किंमत १० लाख ४१ हजार १३१ रुपये इतकी आहे. व्हीआयपी क्रमांकासाठीचे ७० हजार रुपये असे मिळून ११ लाख १८ हजार १६८ रुपये मनपाचे मोजले आहे.
ही धक्कादायक माहिती संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी माहितीच्या अधिकारातून उघड केली आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या तक्रारीतून केली आहे.