चंद्रपूर : मनपा निवडणुकीसाठी २६ प्रभागांच्या कच्च्या प्रारूप आराखड्यावर ५६ जणांनी आक्षेप नोंदविले. सुनावणीला कालावधी शिल्लक आहे. मात्र, विजयाची खात्री नसलेले बहुतांश माजी नगरसेवक सुरक्षित प्रभागांवरच मदार ठेवून हालचाली सुरू केल्या आहेत, तर दुसरीकडे नवीन इच्छुक उमेदवार संधी मिळेल तिथून लढ्यास तयार असल्याचे सध्याचे चित्र आहे.
चंद्रपुरातील आगामी मनपा निवडणुकीसाठी प्रभागांची पुनर्रचना होणार, हे गृहीत धरूनच सत्ताधारी व विरोधी पक्षातील काही माजी नगरसेवकांनी विकासकामे केली. निधीचा आपल्या वाॅर्डात विनियोग केला. २६ नवीन प्रभागांच्या पुनर्रचनेत जुने प्रभाग फुटणारच होते. तसे घडलेदेखील. परंतु धक्कादायक बदल झाला नाही. त्यामुळे भाजप, काँग्रेस व अपक्ष ८० टक्के माजी नगरसेवक नवीन प्रभागांच्या अनुषंगाने सकारात्मक मानसिकता तयार करून कामाला लागले आहेत. नव्या प्रभागाने काही माजी नगरसेवकांना फटका बसू शकतो तर काहींना संधी मिळत असल्याने राजकीय अपेक्षा उंचावल्या आहेत.
सुनावणीकडे लक्ष
२६ प्रारूप प्रभागांत मोठे फेरबदल झाले. त्यामुळे सतत जनतेशी संपर्क ठेवणारे, विकासकामांत रस घेणारे माजी नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते प्रारूप आराखड्यावरून आडाखे बांधत आहेत. ज्यांचे प्रभाग फुटले त्यांनी आक्षेप व सूचना दाखल केल्याने निकाल केव्हा लागतो, याकडे लक्ष लागले आहे.