चंद्रपूर : प्लास्टिक पिशवीचा वापर टाळून पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या अनुषंगाने मनपाने विकल्प थैला हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमातंर्गत पिशवीची गरज भासल्यास ग्राहक विकल्प थैलासाठी नोंदणी केलेल्या दुकानातून तो दहा ते पंधरा रुपयांत थैला विकत घेतील. त्यानंतर पुन्हा तोच थैला ते कोणत्याही नोंदणीकृत दुकानात देऊन पैसे परत घेऊ शकणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या उपक्रमाला चंद्रपूरकरही प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहेत.
प्लाॅस्टिक पिशवीचा वापर करणे दुकानात ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. असा प्रकार आढळून आल्यास मनपातर्फे कारवाई करण्यात येते. परंतु, दुकानातून साहित्य नेताना ग्राहकांना अडचण येऊ नये. तसेच भुर्दंडही बसू नये, म्हणून मनपाने विकल्प थैला हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात नोंदणी केलेल्या दुकानात बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या कापडी पिशव्या दहा ते पंधरा रुपयांना विकत मिळणार आहे. काम झाल्यानंतर त्या ग्राहकाला ती कापड बॅग नोंदणीकृत दुकानात परतही करता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांची अडचणही दूर होणार असून भुर्दंडही बसणार नाही.
४० दुकानांची नोंदणी
मनपाचा विकल्प थैला हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. शहरातील ४० दुकानदारांनी या उपक्रमात नोंदणी केली असून कापडी थैल्या घेऊन गेले आहेत. ग्राहकांना गरज असल्यास ते दहा ते पंधरा रुपये देऊन तो विकल्प थैला विकत घेऊ शकणार आहे.
थैलीवर राहणार क्यूआर कोड
विकल्प थैलावर क्यूआर कोड देण्यात आला आहे. हा कोड स्कॅन केल्यास जवळपासच्या दुकानाची यादी मिळणार आहे. तसेच गुगल लोकेशनही मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांजवळ गेलेली ती थैली त्या दुकानात देऊन पैसे परत घेता येणार आहे.
प्लास्टिक पिशवीमुळे होणाऱ्या प्रदूषणावर आळा घालण्याच्या अनुषंगाने विकल्प थैला हा उपक्रम सुरू केला आहे. विकल्प थैला शॉप म्हणून नोंदणीकृत दुकानातून ग्राहकांना ती थैली मिळेल. त्यानंतर ग्राहक नोंदणीकृत दुकानात ती थैली देऊन रक्कम परत घेऊ शकणार आहेत. यातून ग्राहकांची गरजही भागेल व प्रदूषण टाळण्यास मदत होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या या उपक्रमास प्रतिसाद मिळत आहे.
- विपीन पालिवाल, मनपा आयुक्त चंद्रपूर