- राजेश भोजेकर
चंद्रपूर - राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) घुग्घुस येथील अदानी समूहाच्या एसीसी सिमेंट कारखान्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ‘एनजीटी’च्या पुणे खंडपीठाने पर्यावरण उल्लंघनाशी संबंधित तक्रारींच्या चौकशीसाठी जिल्हा दंडाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची संयुक्त समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहे.
सुरेश पाईकाराव यांनी ७ जून २०२२ रोजी तक्रार केली होती. त्यांची तक्रार एनजीटी कायदा, २०१० च्या कलम १४ आणि १५ अंतर्गत याचिका म्हणून स्वीकारण्यात आली. तक्रारीत, सिमेंट कंपनी नागपूर, मुंबई, पुणे, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि बेंगळुरू येथून टाकाऊ कपडे, कालबाह्य औषधे आणि केसांची वाहतूक करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. प्लास्टिकचा कृषी कचरा जाळल्याने स्थानिक लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. कंपनीच्या या कृतीमुळे वर्धा नदीतील जलप्रदूषण झाल्याचा आरोपही करण्यात आला. रहिवासी आवारात ट्रकच्या पार्किंगमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होत असल्याची तक्रार होती.
‘एनजीटी’ने म्हटले आहे की, या मुद्द्यावर स्थानिक अधिकाऱ्यांनी कारवाई करणे आवश्यक आहे. समितीने केलेल्या कारवाईचा अहवाल ‘एनजीटी’कडे पाठवला जाईल. विशेष म्हणजे, या प्रकरणाची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनीही प्रदूषण नियंत्रण विभाग आणि पर्यावरण मंत्र्यांकडे केली आहे. वैद्य यांनी एसीसी सिमेंट कंपनीत येवून ट्रक देखील पकडून दिले होते.
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने सुरेश पाईकराव यांच्या तक्रारीवरून चौकशीचे निर्देश दिले आहेत. यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण विभाग, खनिकर्म विभागाचे अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही समिती एसीसी कंपनीत भेट देवून या प्रकरणात सविस्तर चौकशी करेल.- विनय गौडा( जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, चंद्रपूर)