चंद्रपूर : महानगरपालिकेमार्फत शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करून कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. १० ऑगस्टअखेरपर्यंत शहरात १ लाख २ हजार १३१ नागरिकांनी कोरोना लसीची पहिली मात्रा घेतली आहे. यातील ४५ हजार ४६८ व्यक्तींची दुसरी मात्रादेखील घेतली आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात १६ जानेवारीपासून करण्यात आली. प्रारंभी आरोग्य सेवेतील व्यक्तींना मात्रा देण्यात आली. यात आतापर्यंत ७ हजार ८६० आरोग्य सेवकांना पहिली मात्रा, तर ६ हजार ४६० जणांना दुसरी मात्रा देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम करणाऱ्या पोलीस, महसूल व इतर अत्यावश्यक सेवेतील ७ हजार ९३९ व्यक्तींना पहिली मात्रा, तर ५ हजार ५९१ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.
तिसऱ्या टप्प्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिक व ६० वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याचे धोरण शासनातर्फे अवलंबण्यात आले. आतापर्यंत ४५ वर्षांवरील ३२ हजार ४१८ नागरिकांना पहिली, तर १५ हजार ९६० व्यक्तींना दुसरी मात्रा घेतली. ६० वर्षांवरील १९ हजार ६१५ नागरिकांना पहिली मात्रा देण्यात आली. यातील १२ हजार ३५६ जणांची दुसरी मात्रा पूर्ण झाली आहे.
शासन निर्देशानुसार चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत २ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लसीकरण सुरू करण्यात आले. त्यासाठी ठिकठिकाणी वाढीव आणि राखीव केंद्रे निर्धारित करण्यात आली होती. यात ३४ हजार २९९ जणांना पहिली मात्रा देण्यात आली. यातील ५ हजार २०१ जणांची दुसरी मात्रा देखील पूर्ण झाली आहे. शासन निर्देशानुसार १० ऑगस्टअखेरपर्यंत एकूण १ लाख ४७ हजार ५९९ जणांना पहिली व दुसरी मात्रा पूर्ण झाली आहे.