- साईनाथ कुचनकार
चंद्रपूर - पथविक्रेत्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत चंद्रपूर महापालिकेद्वारे आतापर्यंत ४ हजार ५९५ पथविक्रेत्यांना १० हजार, ८२५ विक्रेत्यांना २० हजार रुपये, तर ७४ लाभार्थ्यांना ५० हजार रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे. या कर्जातून अनेकांना व्यवसाय उभा करण्यासह व्यवसाय वाढविण्यासाठी मदत झाली आहे.
स्वनिधी योजनेंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या १० हजार रुपयांचा आजपर्यंत सर्वाधिक म्हणजे ४ हजार ५९५ लाभार्थींनी लाभ घेतला आहे. या योजनेचा अधिकाधिक पथविक्रेत्यांना लाभ व्हावा, यासाठी महानगरपालिकेने २ आणि ३ सप्टेंबर रोजी समता चौक, बाबूपेठ वॉर्ड, ४ व ५ सप्टेंबर रोजी शिवानी किराण स्टोअर्स, रमाबाईनगर, अष्टभुजा वॉर्ड, ७ सप्टेंबर रोजी सोनझरी मोहल्ला हनुमान मंदिर बाबुपेठ वॉर्ड, ९ सप्टेंबर रोजी वैद्यनगर तुकुम, ९ सप्टेंबर पं. दीनदयाळ उपाध्याय प्राथमिक शाळा तुकुम, तर १० सप्टेंबर रोजी सवारी बंगला, नगिनाबाग येथे विशेष शिबिर घेण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक व्यावसायिकांना लाभ होणार आहे.
ऑनलाइन अर्ज आणि तत्काळ कर्जपीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. हा अर्ज अगदी नि:शुल्क भरता येते. ३० सप्टेंबरपर्यंत अर्जाचा भरणा करण्यास दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका अभियान कार्यालय, बीपीएल ऑफिस, ज्युबली हायस्कूलसमोर, कस्तुरबा रोड, चंद्रपूर या ठिकाणी सकाळी ११:०० ते ६:०० वाजतापर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.