आॅनलाईन लोकमतनागपूर : चंद्रपुरात नोकरी करणाऱ्या एका प्राचार्यांची शुक्रवारी पहाटे नागपुरात बजाजनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर भीषण हत्या झाल्याने उपराजधानीत खळबळ उडाली आहे.मोरेश्वर महादेवराव वानखेडे (वय ६१) असे मृत प्राचार्यांचे नाव आहे. ते चंद्रपूर (तुकूम) मधील एका महाविद्यालयात प्राचार्य म्हणून सेवारत होते. नागपुरातून ते येणे-जाणे करीत होते. भल्या सकाळी ते दुचाकीने रेल्वेस्थानकावर पोहचायचे आणि तेथून ते रेल्वेने चंद्रपूरला जायचे. रात्री ७.३० च्या सुमारास ते परत येत होते. नरेंद्रनगरातील म्हाडा कॉलनीत प्रा. वानखेडे रहात होते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी पहाटे ४ वाजता ते घरून दुचाकीने रेल्वेस्थानकाकडे निघाले. मात्र अजनी या उपरेल्वेस्थानकापासून काही अंतरावर असलेल्या नीरीच्या (राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था) मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्यांची दुचाकी एकीकडे तर ते बाभळीच्या झाडाजवळ पहाटे ४.४५ वाजता रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसल्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनी नियंत्रण कक्षाला कळविले. त्या माहितीवरून बजाजनगर पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी वानखेडे यांना बघितले असता ते मृतावस्थेत आढळले. मारेकऱ्यांनी त्यांचा गळा कापला होता. झटापटीमुळे त्यांच्या शर्टावर रक्ताच्या चिळकांड्या उडाल्याचेही दिसत होते. पोलिसांनी त्यांना मेडिकलमध्ये नेले. त्यांच्या खिशातील कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या घरी कळवले.कुणी केली हत्याएवढ्या पहाटे प्रा. वानखेडे यांची हत्या कुणी आणि कोणत्या कारणामुळे केली असावी, असा प्रश्न उपस्थित झाला असून, पोलीस त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासोबतच आरोपींचा शोध घेत आहेत.
चंद्रपूरच्या प्राचार्यांची नागपुरात निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 4:35 PM
चंद्रपुरात नोकरी करणाऱ्या एका प्राचार्यांची शुक्रवारी पहाटे नागपुरात बजाजनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर भीषण हत्या झाल्याने उपराजधानीत खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्देपहाटे कापला गळा बजाजनगर ठाण्याजवळ गुन्हा