मनपाचा नाकर्तेपणा :
चंद्रपूर : इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या किटाळी मार्गावरील मुख्य पाईपलाईनची गळती दुरुस्त करण्यास मनपाने निष्क्रियता दाखविल्याने, पाच दिवसांपासून नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी तडफड सुरू आहे.
मोठा गाजावाजा करून शुभारंभ केलेल्या अमृत योजनेचा थेंबही अनेक वाॅर्डांत पोहोचला नाही, म्हणून आधीच रोष कायम आहे. आता तर पाणीच बंद झाल्याने पाणीटंचाई असलेल्या भागात हाहाकार सुरू आहे. अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे चंद्रपुरातील अनेक प्रभागांत जुन्याच योजनेवर नागरिकांना तहान भागवावी लागत आहे. त्यातच आता पाच दिवसांपासून पाणी पुरवठाच ठप्प आहे.
शहराला इरई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. किटाळी मार्गे ही पाईपलाईन टाकण्यात आली. तेथून ही पाईपलाईन जलशुद्धीकरण केंद्रात आणि त्यानंतर चंद्रपुरातील विविध टाक्यांपर्यंत पोहोचविली जाते. किटाळीजवळील मुख्य पाईपलाईनमधून गळती सुरू असल्याने दुरुस्ती करण्यासाठी शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. पाच दिवस पूर्ण होऊनही दुरुस्ती न केल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची तडफड सुरू आहे.
कॅन घेऊन नागरिकांची धावाधाव
पिण्याचे पाणी मिळत नसल्याने महिलांना घागरी घेऊन भटकंती करावी लागत आहे. नागरिक सायकलीवरून कॅन घेऊन जिथे पाणी मिळेल तिथे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. पाच दिवसांपासून घागरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे शहरात संतापाची लाट पसरली आहे.
पाणी विकत घेणे सुरू झाले
बंगाली कॅम्प, बाबूपेठ व नेहरू नगरात सर्वसामान्य नागरिकांची संख्या अधिक आहे. बहुतांश कुटुंबे सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेवर अवलंबून आहेत. पाच दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्याने या भागात हाल सुरू आहेत. बोअरवेल असलेल्या शेजाऱ्यांकडून पाणी घ्यावे लागत आहे, अशी माहिती श्रीधर गेडाम यांनी दिली.