सावली(चंद्रपूर) : एका महिलेला मंगळवारी जखमी करणाऱ्या वाघाची शोधमोहीम सुरू असताना वनविभागाच्या चमुवर वाघाने अचानक हल्ला चढविला. यात वनरक्षक जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास कक्ष क्र. १५४ परिसरात घडली.
सावली तालुक्यातील गेवरा येथील वनरक्षक संदीप चुधरी, असे जखमीचे वनसंरक्षकाचे नाव आहे. सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. बी कामडी यांच्यासह पाथरीचे क्षेत्र सहायक कोडापे, पालेबारसाचे वनरक्षक राकेश चौधरी, खानाबादच्या वनरक्षक पाल, पाथरीच्या शेंडे व इतर सहकारी सकाळी जंगल परिसरात हल्ला करणाऱ्या वाघाची शोधमोहीम राबवत असताना वाघाने अचानक हल्ला करून संदीप चुधरी या वनरक्षकाला जखमी केले.
जखमीला सावली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले आहे. मंगळवारी तेंदूपाने संकलनाकरिता गेलेल्या महिलेला याच परीसरात वाघाने जखमी केले होते. या परीसरातील नागरिकांनी जंगल भागात जाऊ नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.