जिवती (चंद्रपूर) : तालुक्यातील काकबन, भुरियेसापूर, टाटाकोहाड, सिंगारपठार, शेडवाही येथील वनहक्क पट्टेधारक पीक कर्जासाठी जिवती येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत तीन महिन्यांपासून उंबरठे झिजवत आहेत. पीक कर्ज देण्यात यावे, असे जिल्हाधिकारी कार्यालय व जिवती तहसील कार्यालयाने पत्र देऊनही आदिवासी कोलाम बांधवांना पीक कर्ज मिळाले नाही. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी बुधवारी बॅंकेला कुलूप ठोकले. अखेर अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
अफ्रोट संघटनेचे डॉ. मधुकर कोटनाके, श्रमिक एल्गारचे घनश्याम मेश्राम, बिरसा क्रांती दलाचे संतोष कुलमेथे यांच्या नेतृत्वात वनहक्कधारकांना घेऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत पीक कर्ज मिळणार नाही, तोपर्यंत बँकेतून जाणार नाही, अशी भूमिका घेतल्याने बँकेच्या व्यवस्थापकाची तारांबळ उडाली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना पाचारण केले. बँक व्यवस्थापकांनी चंद्रपूर येथील त्यांच्या अधिकाऱ्यांना फोन करून प्रकरणाचे गांभीर्य कळविले. बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी जिवतीला येऊन प्रश्न सोडविण्याची तयारी दर्शविल्यामुळे कुलूपबंद आंदोलन मागे घेण्यात आले.
तीन महिन्यांपासून बँकेचे उंबरठे झिजवत असून, यात आमचे प्रचंड नुकसान झाले आहे. बँकेला स्टॅम्पपेपर, नादेय प्रमाणपत्र, सर्व कागदपत्रे देऊनसुद्धा पीक कर्ज दिले जात नाही. या बँकेने आमची आर्थिक लूट केली.
- पार्वता कांशीराम चाहकाटी, वनहक्क पट्टेधारक महिला