चंद्रपूर : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांनी येथे बुधवारी आपण भाजपात प्रवेश घेणार असल्याची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळापेक्षा फडणवीस सरकारच्या काळात ओबीसींबाबत सर्वाधिक निर्णय झाले. भाजप सरकारच ओबीसींना न्याय देण्यास सक्षम आहे. भाजप प्रवेशामागे हे प्रमुख कारण असल्याचे डाॅ. जिवतोडे यांनी यावेळी स्पष्ट केले. ही राजकीय घडामोड राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
येत्या २५ जून रोजी चंद्रपूरातील जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर दुपारी ३ वाजता डॉ. जिवतोडे यांच्या भाजप प्रवेशाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे हे स्वत: या सोहळ्याला उपस्थित राहून हा पक्षप्रवेश घडवून आणार आहे. ही चंद्रपूर जिल्ह्याच्याच नव्हे तर विदर्भातील राजकारणातील ही मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे.
डॉ. जिवतोडे यांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसला विदर्भात वजनदार ओबीसी नेता लाभला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण होते. या काळात राष्ट्रवादीचे सर्वच नेते डॉ. जिवतोडे यांच्याकडे येऊन गेले. मात्र पक्षाने जिवतोडे यांच्यावर कोणतीच महत्त्वाची जबाबदारी सोपविली नाही. परिणामी जिवतोडेंचा अपेक्षाभंग झाला.
ओबीसी नेते म्हणून ते ओळखले जातात. महाविकास आघाडीच्या काळात ओबीसींना न्याय मिळवून देऊ शकलो नाही याची खंत त्यांना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर ते नाराज असल्याचा सूर होता. नेमक्या याच संधीचे भाजपने सोने केले. नागपूर शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूरातील मातोश्री वृद्धाश्रमात डॉ. जिवतोडे यांच्याशी बंदद्वार चर्चा केली. यावेळी डॉ. जिवतोडे यांना भाजपची ऑफर दिली. तेव्हापासून डॉ. जिवतोडे यांचे मन राष्ट्रवादीत रमत नव्हते.
भाजपची खेळी यशस्वी
चंद्रपूर खासदार बाळू धानोरकर यांच्या हयातीतच डॉ. अशोक जिवतोडे हे भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. या प्रवेशापूर्वी दुर्दैवाने खासदार धानोरकर यांचे अकाली निधन झाले. धानोरकर हे ओबीसी नेते होते. शिवाय ते कुणबी समाजाचेही नेते होते. त्यांच्या जाण्याने कुणबी समाजाची मोठी हानी झाली. ही पोकळी भरून काढण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून कुणबी समाजाला लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. डॉ. अशोक जिवतोडे या चौकटीत सर्वबाजूने तंतोतंत बसतात. त्यांची प्रतिमाही स्वच्छ आहे. ते सर्वांशी जुळवून घेतात. या पार्श्वभूमीवर भाजपने ही यशस्वी खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.