चंद्रपूर : पाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटी कंपनीच्या मनमानी कारभारामुळे व महापालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे नागरिक सध्या पाण्यासाठी टाहो फोडत आहे. कुठे तासभर तर कुठे त्याहून कमी काळ नळाद्वारे पाणी पुरवठा होत आहे. मागील काही दिवसांपासून तर अनेक ठिकाणी पहाटे ४ वाजताच नळ सोडून ७ वाजता बंद केला जातो. यातही अनियमितता असल्याने चंद्रपूरकर पाणी पुरवठ्याबाबत चांगलेच संतापले आहेत.चंद्रपूरची लोकसंख्या चार लाखांच्या घरात गेली आहे. पूर्वी चंद्रपूरला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी जीवन प्राधीकरणाकडे होती. त्यावेळी एखादवेळी पाण्याची बोंब व्हायची. त्यानंतर पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगरपालिकेकडे देण्यात आली. बऱ्याच कालावधीपर्यंत नगरपालिकेने स्वत: ही जबाबदारी सांभाळली. त्यावेळी शहरात काही ठिकाणी पाईप लाईन बदलविण्यात आली होती. यालाही आता ५०-६० वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यानंतर पुढे कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे व वाढत्या कामाच्या ताणामुळे नगरपालिका प्रशासनाला शहराला पाणी पुरवठा करणे जिकरीचे होऊ लागले. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे खासगीकरण करण्यात आले. पाणी पुरवठ्याचे खासगीकरण झाल्यानंतरच पाणी पुरवठ्याचे धिंडवडे उडाले. वितरण व्यवस्थाच अस्तित्वात आहे की नाही, असेच वाटायले लागले. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या पाणी पुरवठा करण्यासाठी अस्तित्वात असलेली पाईप लाईन ६० वर्ष जुनी असून खिळखिळी झाली आहे. ही पाईप लाईन केव्हाच कालबाह्य झाल्याचे महापालिका प्रशासनानेही मान्य केले आहे. असे असताना त्याच पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या शहराचा पाणी पुरवठा करण्याचे कंत्राट उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. मात्र या कंपनीचे वितरण व्यवस्थेकडे अजिबात लक्ष नसल्याने शहरभर पाण्यासाठी बोंबा मारल्या जात आहे. नवीन कनेक्शन देऊन ही कंत्राट कंपनी मोकळी होते. पुढे त्या कनेक्शनधारकाला व्यवस्थित पाणी मिळत आहे की नाही, हे पाहण्याचे सौजन्यही दाखविले जात आहे. एखाद्याने पाणी मिळत नाही, अशी तक्रार केली की त्याला पुन्हा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरातील एक-दोन वॉर्ड सोडले तर जवळजवळ सर्वच वॉर्डात अनियमित व अत्यल्प पाणी पुरवठा होत आहे. हॉस्पीटल वार्ड, सिव्हील लाईन, रामनगर, पठाणपुरा, विठ्ठल मंदिर वार्ड, भानापेठ वार्ड, बालाजी वार्ड, एकोरी वार्ड, घुटकाळा वार्ड, जीवन ज्योती कॉलनी, तुकुम परिसरातील वार्ड आदी भागात अतिशय कमी पाणी पुरवठा केला जात आहे. कुठे एक तास तर कुठे त्याहून कमी पाणी येते. त्यातही धारही मोठी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठे हाल सहन करावे लागत आहे. अनेकवेळा तर नळच येत नाही. पूर्वी नळ येत असला की तशी सूचना ध्वनीक्षेपकांमार्फत नागरिकांना दिली जात होती. आता संबंधित कंत्राटदाराला त्याचेही महत्त्व वाटत नाही. (शहर प्रतिनिधी)पहाटेच येतो नळविशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून नळ पहाटे ४ वाजताच सोडण्यात येत आहे. सकाळी ७ वाजता नळ बंद होतो. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे. काही नागरिकांनी याबाबत कंत्राटदारांकडे जाऊन विचारणा केली असता त्यांना पहाटेच नळ सोडण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. वेळ बदलल्याची सूचनाही नागरिकांना देण्यात आली नाही. पहाटे उठून झोपमोड करीत पाणी कसे भरणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. पहाटेच्या वेळेत नळ सोडण्याची गरजच काय असा सवालही उपस्थित केला जात आहे. ही कंत्राटदाराची मनमानी असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. एकूण पाणी पुरवठ्यामुळे नागरिक चांगलेच संतापले आहेत.२५ हजार ४०० कनेक्शनशहराची लोकसंख्या मोठी असली तरी अधिकृत नळ कनेक्शन २५ हजार ४०० आहेत. दरवर्षी २०० ते ३०० कनेक्शन वाढत असते. पूर्वी कनेक्शन लावताना ९७६ रुपये शुल्क आकारले जायचे. आता यात वाढ होऊन प्रति कनेक्शन १०७४ रुपये शुल्क करण्यात आले आहे. कनेक्शन दिल्यानंतर कनेक्शनधारकाला पाणी मिळत आहे की नाही, हे पाहण्याचे सौजन्य कुणीही दाखवित नाही. त्यामुळे नागरिक संतापले आहेत.शहराला हवे ४० दशलक्ष मीटर पाणीचंद्रपूर शहराची लोकसंख्या चार लाखांच्या घरात आहे. संपूर्ण शहराला दररोज ४० दशलक्ष मीटर पाण्याची गरज असल्याची माहिती मनपाचे अभियंता बोरीकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. प्रत्येक व्यक्तीला ९० ते १०० लिटर पाणी दररोज लागते. मात्र यापैकी ३० ते ३५ लिटरही पाणी दरडोई मिळत नाही.
चंद्रपुरातील पाणी पुरवठा कोलमडला
By admin | Published: December 08, 2015 12:46 AM