चंद्रपूर :जिल्हा परिषद, चंद्रपूर व जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या आणि बल्लारपूर, वरोरा, राजुरा, मूल, चिमूर, घुग्गुस व नागभीड या नगर परिषदांमधील व भिसी नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता २८ जुलै रोजी आरक्षण सोडत जाहिर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील कलम १२ उपकलम (१), कलम ५८ (१) (अ) प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम) नियम, १९९६ नुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवण्याच्या जागा आणि उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवण्याच्या जागा निश्चित होतील. आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी प्रशासनाने कार्यक्रम जाहीर केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
असा आहे कार्यक्रम
- जिल्हा परिषद चंद्रपूरसाठी २८ जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन येथील सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सोडत होणार आहे. आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्याची तारीख २९ जुलै २०२२ आहे. आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी व संबंधित तहसीलदार यांच्याकडे हरकती व सूचना २९ जुलै २ ऑगस्ट २०२२ हरकती घेता येणार आहे.
- पंचायत समिती चिमूर. नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही. भद्रावती, वरोरा, चंद्रपूर, मुल, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, बल्लारपूर, कोरपना, जिवती व राजुराकरिता आरक्षण निश्चित करण्यासाठी २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता संबंधित तहसील कार्यालयात पार पडेल. आरक्षणाचे प्रारूप २९ जुलै रोजी प्रसिद्धी होणार आहे. आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी व संबंधित तहसीलदार यांच्याकडे २९ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत हरकती घेता येणार आहे.
उपस्थित राहता येणार
जिल्हा परिषद व पंचायत समितीतील सभेस ज्यांना हजर राहण्याची इच्छा असेल त्यांना उपस्थित राहता येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अश्विनी माजे यांनी कळविले आहे.
आरक्षण सोडतीसाठी पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
राज्य निवडणूक आयोगाने चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, वरोरा, राजुरा, मूल, चिमूर, घुग्गुस व नागभीड या नगर परिषदांमधील व भिसी नगर पंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांचे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी आरक्षण सोडत २८ जुलैरोजी दुपारी १२ वाजता संबंधित नगरपरिषद, नगरपंचायत कार्यालयात पार पडणार आहे.
नगरपरिषद व नगरपंचायतीचे आरक्षण सोडतपासून अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यापर्यंतच्या कार्यवाहीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पीठासीन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
बल्लारपूर न.प करिता उपविभागीय अधिकारी, बल्लारपूर, वरोरा न.प. करिता उपविभागीय अधिकारी, वरोरा, मुल न.प. करिता उपविभागीय अधिकारी, मूल, राजुरा न.प. करिता उपविभागीय अधिकारी, राजुरा, चिमूर न.प. करिता उपविभागीय अधिकारी, चिमूर, नागभीड न.प. करिता उपविभागीय अधिकारी, नागभीड व घुग्गुस न.प. करिता उपविभागीय अधिकारी, चंद्रपूर, तर भिसी नगर पंचायतीकरिता उपविभागीय अधिकारी, गोंडपिपरी यांची पीठासीन अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आरक्षण सोडतीवेळी संबंधित नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्रातील इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.