चंद्रपूर : औद्योगिक जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच दुचाकी तर आता प्रत्येक घरीच असल्याची स्थिती आहे. मात्र काही जण दुचाकीला कर्णकर्कश हाॅर्न लावत असल्यामुळे इतरांना त्रास होत असून ध्वनिप्रदूषणातही वाढ झाली आहे. वाहतूक पोलीस प्रशासन कारवाई करीत आहे. मात्र दंड भरून चालक मोकळे होत आहे. त्यामुळे आता कडक कारवाई करणे अत्यावश्यक झाले आहे.
चंद्रपूर शहर तसेच जिल्ह्यातील काही भागामध्ये अनेक युवक आपल्या वाहनाला कर्णकर्कश हाॅर्न लावून गर्दीच्या ठिकाणी वाहने वेगात नेतात. शहरातील काही रस्त्यांवर ते हमखास फिरतात. वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्यामुळे त्यांचे चांगलेच फावले आहे. मात्र यामुळे सामान्य नागरिकांसह रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कर्णकर्कश हाॅर्नमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच आजारी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, काही तरुण तर दुचाकीचे सायलन्सर फोडून वाहन दमडतात. त्यामुळे बाजूने जाणाऱ्यांची भंबेरी उडते. अनेकवेळा अपघातही झाले आहे. शहरातील रस्ते अरुंद आहे. त्यातच हे तरुण वाहनांचा वेगवेगळा आवाज काढत नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी आता मोहीम राबवून कडक कारवाई करणे गरजेचे आहे.
बाॅक्स
कानाचेही आजार वाढू शकतात
कर्णकर्कश हाॅर्नमुळे लहान मुलांसह ज्येष्ठांनाही त्रास होऊ शकतो. त्यांची श्रवण क्षमता कमी होऊ शकते. बधिरपणाही येऊ शकते. डोकेदुखी, तणाव आदी समस्यांमध्ये ध्वनिप्रदूषण असू शकते.
बाॅक्स
शहरात हाॅर्नची फॅशन
चंद्रपूर शहरात काही बुलेट, पल्सर आदी दुचाकी वाहनांना फॅन्सी हाॅर्न लावण्यात आले असून या हाॅर्नमुळे रस्त्यावरील इतरांना त्रास होतो. विशेष म्हणजे, तरुणांमध्ये फॅन्सी हाॅर्न लावण्याची क्रेझ आहे. पोलीस कधी काळी कारवाई करतात. मात्र दंड भरून पुन्हा ते मोकळे होते. त्यामुळे अशा वाहनचालकांवर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे.
बाॅक्स
नागपूर रस्त्यावर रात्री रेस
चंद्रपूर-नागपूर या रस्त्यावरील वरोरा नाका ते पडोली चौकापर्यंत काही दुचाकी चालक वाहनांची रेस लावतात. विशेष म्हणजे, कर्णकर्कश हाॅर्न तसेच सायलन्सरचा आवाजही मोठ्या प्रमाणात असतो. रात्री ८ ते ११ वाजेपर्यंत ते अनेकवेळा या रस्त्याने फेऱ्या मारतात. या रस्त्यावर अनेक रुग्णालये आहे. तसेच रस्त्यावर सारखी वर्दळ असते. त्यामुळे या तरुणांना आवर घालणे गरजेचे आहे.
-