चंद्रपूरचा पाणीपुरवठा : न्यायालयाच्या निर्देशामुळे नागरिकांना दिलासा चंद्रपूर : अनियमित आणि दूषित पाणी पुरवठ्यामुळे चंद्रपूरकर मागील अनेक महिन्यांपासून त्रस्त आहेत. महापालिकेच्या आमसभेत वारंवार याबाबत ओरड होऊनही निर्णय होत नाही. केवळ याच मुद्यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी महापालिकेची विशेष सभा बोलाविली जाते. मात्र त्यातही निर्णय होत नाही. या अनियमित व दूषित पाणी पुरवठ्यासंदर्भात विदर्भ प्रहार कामगार संघटनेने दाखल केलेल्या याचिकेची न्यायालयाने दखल घेतली असून चंद्रपूरकरांना पुरवठा होत असलेल्या पाण्याचे विविध ठिकाणावरून नमूने घ्या व दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. नगरसेवक, महापालिका, आमसभा यांनी तर काही केले नाही. मात्र न्यायालयाने दूषित पाण्याची दखल घेतल्यामुळे चंद्रपूरकरांना दिलासा मिळाला आहे. चंद्रपुरातील पाणी वितरण व्यवस्थाच मागील अनेक महिन्यांपासून कोलमडली आहे. भरमसाठ कर भरूनही नागरिकांना व्यवस्थित पाणी मिळत नाही. जे मिळते, तेही दूषित असते. चंद्रपूरची लोकसंख्या चार लाखांच्या घरात गेली आहे. लोकसंख्या मोठी असली तरी जिथून शहराला पाण्याचा पुरवठा होतो, त्या इरई धरणात मुबलक जलसाठा आहे. त्यामुळे चंद्रपुरात कधी पाणी टंचाई भासूच शकत नाही. मात्र कंत्राटदाराच्या बेजबाबदार धोरणामुळे नागरिकांना मुबलक जलसाठा असतानाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सप्टेंबर २०११ मध्ये चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठ्याचे कंत्राट उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले. तेव्हापासून पाणी पुरवठ्याचे धिंडवडे उडाले आहे. वितरण व्यवस्थाच अस्तित्वात आहे की नाही, असेच वाटायले लागले. सध्या पाणी पुरवठा करण्यासाठी अस्तित्वात असलेली पाईप लाईन ६० वर्ष जुनी असून खिळखिळी झाली आहे. ही पाईप लाईन केव्हाच कालबाह्य झाल्याचे महापालिका प्रशासनानेही मान्य केले आहे. असे असताना त्याच पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. नवीन कनेक्शन दिले की आपण मोकळे, अशी भूमिका उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीने अंगिकारली आहे. देखभाल, दुरुस्ती, नियोजन याकडे लक्षच दिले जात नाही. एखाद्याने पाणी मिळत नाही, अशी तक्रार केली की त्याला पुन्हा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरातील एक-दोन वॉर्ड सोडले तर जवळजवळ सर्वच वॉर्डात अनियमित व अत्यल्प पाणी पुरवठा होत आहे. हॉस्पीटल वार्ड, सिव्हील लाईन, रामनगर, पठाणपुरा, विठ्ठल मंदिर वार्ड, भानापेठ वार्ड, बालाजी वार्ड, एकोरी वार्ड, घुटकाळा वार्ड, जीवन ज्योती कॉलनी, जगन्नाथबाबा नगर, तुकुम परिसरातील वार्ड आदी भागात अतिशय कमी पाणी पुरवठा केला जात आहे. कुठे एक तास तर कुठे त्याहून कमी पाणी येते. विशेष म्हणजे, नळ आल्यानंतर प्रारंभी काही वेळ दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी वापरता येत नाही. दरम्यान, चंद्रपुरातील दूषित व अनियमित पाणी पुरवठ्यासंदर्भात विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या अध्यक्ष अॅड. हर्षल चिपळूनकर यांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली. चंद्रपुरात उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मागील अनेक महिन्यांपासून अनियमित पाणी पुरवठा केला जात आहे. अनेक ठिकाणी दूषित पाणी दिले जात आहे. शहरातील १२ पाण्याच्या टाक्यांना छत नाही. त्या ठिकाणी कुठलाही सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आलेला नाही. कुणीही, केव्हाही या पाण्याच्या टाक्यावर चढू शकतो. यामुळे सुरक्षा धोक्यात आली आहे. याशिवाय शहरातील पाईप लाईन अनेक ठिकाणी लिकेज असल्यामुळे नाल्याचे, गटाराचे पाणी शिरुन नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. असे पाणी प्यायल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असेही अॅड. चिपळूणकर यांनी याचिकेत म्हटले आहे. यासोबतच शहरातील काही टाक्या अतिशय जीर्ण झाल्या आहेत. त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता असल्याचेही याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने काल गुरुवारी सुनावणी दिली. यात न्या.भूषण गवई आणि न्या. देशपांडे यांनी चंद्रपुरात नागरिकांना पुरवठा होणाऱ्या पाण्याचे विविध ठिकाणाहून नमुने घ्या. या पाण्याची तपासणी करून अहवाल दोन आठवड्यात न्यायालयात सादर करा, असे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. (शहर प्रतिनिधी) कित्येक आमसभा निर्णयाविनाच गेल्या ४विशेष म्हणजे, चंद्रपुरातील अनियमित पाणी पुरवठ्याबाबत नागरिकांची सातत्याने ओरड झाल्यानंतर नगरसेवकही याबाबत ओरडू लागले. महापालिकेच्या अनेक आमसभेत नगरसेवकांनी आपला संताप व्यक्त करीत उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीचा करार रद्द करण्याची मागणी केली. केवळ चंद्रपुरातील पाणी पुरवठ्याबाबत चर्चा करण्यासाठी अलिकडेच एक विशेष सभा घेण्यात आली होती. त्यातही याबाबत ठोस निर्णय महापालिका घेऊ शकली नाही. त्यामुळे चंद्रपूरकरांच्या नशिबी दूषित पाणी व पाण्यासाठी भटकंती कायम आहे. चंद्रपुरात अनेक महिन्यांपासून दूषित व अनियमित पाणी पुरवठा होत आहे. २०१५ पासूनच आम्ही पाणी पुरवठा यंत्रणेची माहिती गोळा करीत आहोत. फेब्रुवारी २०१६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली. गुरुवारी न्यायालयाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाण्याचे नमूने घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अॅड. हर्षल चिपळूणकर, अध्यक्ष, विदर्भ प्रहार कामगार संघटना, चंद्रपूर.
अनियमितपणामुळे चंद्रपूरकर वैतागले !
By admin | Published: October 08, 2016 1:49 AM