चंद्रपूर : हाताने टायपिंग करणे सर्वांना माहित आहे. मात्र, चक्क दातांमध्ये पेन घेऊन धडाधड टायपिंग करणारा चंद्रपुरातील हर्षल नेवलकर या युवकाच्या कर्तृत्वाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. आता तो गिनीज रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदविण्याच्या तयारीला लागला आहे.
चंद्रपुरातील बाबूपेठ येथील ३५ वर्षीय हर्षल नेवलकर याने संगणक की टायपिंग क्षेत्र निवडले. या क्षेत्रात काही तरी वेगळे करण्याच्या ध्यासातून तो अक्षरश: झपाटला. विशेष म्हणजे त्याने कुठेही रीतसर प्रशिक्षण घेतले नाही. प्रशिक्षण न घेता आणि टायपिंग करताना बोटांचा वापर न करता टायपिंग करण्याचा त्याने निश्चय केला. प्रयत्नातून सारे काही शक्य होते या ध्यासाने त्याने चक्क दाताने टायपिंग करण्याचे कौशल्य आत्मसात केले.
कम्प्युटर की बोर्ड फास्टेस्ट टायपिंगमध्ये तो निपून झाला. डोळ्यावर पट्टी बांधून (१८० डिग्री रोटेट) ए टू झेड अल्फाबेट विथ स्पेस फक्त सहा सेकंदमध्ये पूर्ण केले आहे. दुसरा रेकॉर्ड हाताचा वापर न करता दातामध्ये पेन घेऊन ए टू झेड अल्फाबेट विथ स्पेस टाईप केले. तेही केवळ १४ सेकंदात. या दोनही विक्रमांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. आता तो गिनीज रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदविण्याच्या तयारीला लागला आहे.
दिव्यांगांना समर्पण
समाजात अनेक दिव्यांग आहेत. त्यांनाही प्रगतीची संधी मिळायला हवी. मी अथक प्रयत्न करून हातांचा वापर न करता दाताने टायपिंग करण्याचे कौशल्य आत्मसात केले. मला आतापर्यंत दोन विक्रम करता आले. गिनीज रेकॉर्डमध्ये विक्रम करण्याची तयारी सुरू केली. आतापर्यंतचे दोन विक्रम ज्यांना हातबोट नाहीत, अशा दिव्यांगाना समर्पित केल्याची भावना हर्षल नेवलकर याने व्यक्त केली.