चंद्रपूर : भारतात अतुलनीय कार्य करणाऱ्या ३० वर्षांखालील गेमचेंजर्समध्ये चंद्रपूरच्या २६ वर्षीय सारंग कालिदास बोबडे याची दखल जागतिक पातळीवर फोर्ब्स इंडियाने घेतली आहे. नावीन्यपूर्ण आणि सकारात्मक बदल घडविण्यासाठी धडपडणाऱ्या तरुण, प्रभावशाली उद्योजक, व्यावसायिक, डिझायनर, तसेच खेळाडूंचा ‘फोर्ब्स इंडिया’ यादीत समावेश करण्यात येताे. तो मान सारंग बोबडे याला मिळाला आहे. २०१० मध्ये धानाच्या एचएमटी वाणाचे जनक दादाजी खोब्रागडे यांची फोर्ब्सने दखल घेतली होती. यानंतर हा बहुमान सारंग बोबडेच्या रूपाने चंद्रपूर जिल्ह्याला दुसऱ्यांदा मिळाला आहे.
२०१७ नंतर एकलव्य इंडियाचे संस्थापक आणि सीईओ राजू केंद्रे यांच्या पुढाकारात अनिलकुमार रेड्डी, संदीप शर्मा व चंद्रपूरचा सारंग बोबडे हे त्रिकूट एकत्र आले. या तिघांच्या परिश्रमातून डोनेटकार्ट या ई-कामर्स प्लाॅटफार्मचा जन्म झाला. या माध्यमातून १० लाखांहून अधिक देणगीदारांकडून तब्बल १५० कोटींच्या देणग्या विविध भागात काम करणाऱ्या हजार स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) पुरविल्याचा अनोखा विक्रम या त्रिकुटाने केला आहे. याची दखल फोर्ब्स इंडिया या मासिकाने जागतिक पातळीवर घेतली. या मासिकाने २०२२ च्या अंकात भारतातील ३० वर्षांखालील युवकाच्या ३० जणांमध्ये एनजीओज अँड सामाजिक उद्योजकतामध्ये सहसंस्थापक डोनेटकार्ट म्हणून अनिलकुमार रेड्डी, संदीप शर्मा व चंद्रपूरचा सारंग बोबडे यांचा समावेश करण्यात आला आहे. सारंगसह राजू केंद्रे हे दोघे विदर्भातील आहेत, तर इतर दोघे हे अन्य राज्यातील आहे.
मूळचे भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील रहिवासी असलेले सारंगचे वडील कालिदास बाेबडे हे चंद्रपूर तालुक्यातील पिपरी येथील जनता विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत, तर आई याच शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सारंगचे दहावीपर्यंतचे शिक्षण चंद्रपूर येथील चांदा पब्लिक स्कूलमध्ये पूर्ण झाले. इयता बारावीपर्यंतचे शिक्षण त्याने राजस्थान येथील कोटा येथून पूर्ण केले, तर मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नाॅलाॅजी येथून केमिकलमध्ये बी.टेक. पूर्ण केले. यानंतर अनिलकुमार रेड्डी, संदीप शर्मा व चंद्रपूरचा सारंग बोबडे हे त्रिकूट एकत्र आले. त्यांनी डोनेटकार्ट या ई-कामर्स प्लाॅटफार्मच्या माध्यमातून अतुलनीय कामगिरी करून हा लौकिक मिळविला.
राज्यपालांच्या हस्तेही मिळाला होता अवाॅर्ड
महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते २०२१ मध्ये सारंगला नॅशनल बिजनेस एक्स्लेंट ॲन्ड ॲचिव्हर्स अवाॅर्ड मिळाला होता.
संस्था उभारल्यानंतर संस्थेच्या वाढीचा विचार करणे एवढेच महत्त्वाचे नाही तर लोकांची वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढ होताना अनुभवणे हे आहे. हे यश आणि सन्मान मिळविताना आपण बघतोय हा खरोखरच अभिमानाचा क्षण आहे.
- सारंग बोबडे, चंद्रपूर.
मुलाने केलेल्या या कामगिरीने झालेला आनंद शब्दात सांगणे अवघड आहे. त्यांच्या कर्तृत्वाने चंद्रपूर जिल्ह्याचा मान उंचावलेला आहे. इतकेच नव्हे तर विदर्भातून दोन मुलांची फोर्ब्सने दखल घेतल्याचा अत्यानंद होता आहे. नव्या पिढीसाठी हे आदर्शवत कार्य आहे.
- कालिदास बोबडे, सारंगचे वडील.