फोटो
चंद्रपूर : सत्ता कुणाचीही असो, जनतेच्या हितासाठी आवाज उठविलाच पाहिजे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून आरोग्य क्षेत्रासोबतच अनेक क्षेत्रांमध्ये जिल्ह्यात अनागोंदी कारभार सुरू आहे. डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवेवर विपरित परिणाम झाला. दारू विक्री व कोंबड बाजार सुरू झाल्याने कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्चचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे या प्रश्नांकडे पालकमंत्री लक्ष देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा व संपर्क मंत्र्यांना पाठवावे अशी मागणी काँग्रेसचे माजी खासदार व विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष नरेश पुगलिया धरणे आंदोलनादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत केली.
कोरोना महामारीकडे दुर्लक्ष, अमली पदार्थाची तस्करी, दारू तस्करी, रेती तस्करी अशा अनेक अवैध धंदे व अनागोंदी कारभार थांबविण्याच्या मागणीसाठी सोमवारी येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौकात पुगलिया यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत पुगलिया म्हणाले, महाराष्टÑाच्या निर्मितीनंतर स्वातंत्र्य सेनानी दादासाहेब कन्नमवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूर - गडचिरोली जिल्हा एक असताना या जिल्ह्यात औद्येगिक क्रांती, रस्ते, पूल व इतर विकासाची वाटचाल सुरू झाली. या विकासाभिमुख औद्योगिक जिल्ह्यात एक चांगले व जनतेला पोषक वातावरण असताना आजच्या घडीला चंद्रपूर जिल्ह्याचे वातावरण भ्रष्ट व दूषित झाले आहे. या जिल्ह्यात कोरोना महामारीमुळे ९० टक्के मृत्यूचे प्रमाण शासकीय मेडिकल व जिल्हा रूग्णालयात आहे व याउलट खासगी दवाखान्यात मृत्यूचे प्रमाण फक्त १० टके आहे. एवढी मोठी तफावत आरोग्य सेवेत का? आणि ही परिस्थिती ओढायला जबाबदार कोण, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
एवढया प्रमाणात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी व शासकीय दवाखान्यात डॉक्टरांची व इतर आरोग्य सेवकांची त्वरित पूर्तता करण्यात यावी, या जिल्ह्यातील अवैध धंद्यांना उत आला आहे. रेती तस्करी, दारू तस्करी, कोळसा तस्करी, अमली पदार्थांची तस्करी, कोंबड बाजार, हत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कर्नाटका एम्टातून साडेचार लाख टन कोळसा चोरी जाणे ही बाब या जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कशी आहे, हे सांगणारी आहे. याला आळा बसणे गरजेचे आहे, अशी मागणीही त्यांनी केली.
आंदोलनात युवा नेते राहुल पुगलिया, गजानन गावंडे, अविनाश ठावरी, अशोक नागापुरे आदी उपस्थित होते.
बॉक्स
मुख्यमंत्र्यांना पत्र
याबाबत पुगलिया यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एक पत्र पाठवून महाराष्टÑसारखा पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने आपल्या राज्यातील जिल्हास्तरापासून तर ग्रामपंचायत स्तरापर्यंत विकासाचा दृष्टीकोन तसेच कोरोनासारखा महामारीत जनतेच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी पेलण्यासाठी जिल्ह्यात एक सक्षम प्रमाणिक चारित्र्यवान मंत्री त्वरित द्यावा व वरील प्रश्नावर आपल्या स्तरावर योग्य मार्ग काढावा, अशी मागणी केली आहे. तसेच जिल्ह्याचे संपर्क मंत्री यांनीसुद्धा पुढाकार घेऊन जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने जनतेला न्याय द्यावा, ही अपेक्षा व्यक्त केली आहे.