चंद्रपूर : २५०० वर्षांपूर्वी आयुर्वेदातील प्रमुख चिकित्सा ग्रंथ ‘चरकसंहिता’ चरक ऋषींनी लिहिला. ज्याचा समावेश आजही आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमात आहे. आयुर्वेदात चरक ऋषी हे प्रथम चिकित्सक म्हणून गणले जातात. त्यांनी जवळपास अकराशे व्याधींचे वर्णन चरकसंहितेमध्ये केले आहे. त्याचप्रमाणे, ३० ते ४० हजार औषधी कल्पांचे वर्णनही त्या काळात केले आहे. आजही एवढ्या वर्षांनंतर व्याधींचे निदान व चिकित्सा तंतोतंत लागू पडतात, त्यामुळे आधुनिक काळात चरकसंहिता महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन आयुर्वेदाचार्य डॉ.राजीव धानोरकर यांनी केले.
विमला देवी आयुर्वेदिक कॉलेज, वांढरी येथे चरक जयंतीनिमित्त चरकसंहिता या विषयावर व्याख्यान पार पडले. यावेळी ते बोलत होते. डॉ.धानोरकर पुढे म्हणाले, आयुर्वेद हे फक्त चिकित्साशास्त्र नसून जीवन जगण्याचे शास्त्र आहे. दीर्घायू व स्वस्थ जीवन कसे जगावे, याचे संपूर्ण वर्णन आयुर्वेदाच्या या ग्रंथांमध्ये आहे. कोरोना व्याधीला पॅनडॅमिक म्हटले आहे. चरक यांच्या काळात जनपदोध्वंस या नावाने या व्याधीचा उल्लेख आहे. त्याची कारणे, चिकित्सा, तसेच आयसोलेशन कसे करावे, याचे पूर्ण वर्णन त्यात असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच चरक संहितेचा अभ्यास कसा करावा, रोजच्या जगण्यात त्यांनी सांगितलेली सूत्रे कशी वापरावीत, निदान कसे करावे, आयुर्वेदाची चिकित्सा उत्तम कशी करावी, याबाबत विविध दाखल देत मार्गदर्शन केले. याप्रसंगी आयुर्वेदिक चिकित्सक, कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, कॉलेजमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.