राजेश बारसागडे लोकमत न्यूज नेटवर्क सावरगाव : रिलायन्स समूहाच्या जिओ नेटवर्कने संपूर्ण देशात जाळे विणले. फोर-जी सेवा दिली आणि कमी पैशात अधिक डेटा मिळत असल्यामुळे ग्राहकांनी जिओची सेवा स्वीकारली. मात्र, मागील काही महिन्यांपासून जिओचे नेटवर्क कमालीचे घसरले आहे. फोरजी सेवा असून टूजी सेवेसारखी स्थिती निर्माण झाली आहे. या असुविधेचा मनस्ताप ग्राहकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, जिओ नेटवर्कने ग्राहकांना योग्य सुविधा पुरवावी अशी मागणी जिओ सिमधारकांनी केली आहे.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जिओ सिमधारक आहेत. त्यानुसार पूर्वी जिओ नेटवर्कची सुविधासुद्धा बऱ्यापैकी होती. परंतु मागील काही दिवसांपासून टॉवरची क्षमता असूनसुद्धा मोबाइलला योग्य नेटवर्क मिळेनासे झाले आहे. क्षमता कमी आणि वापरकर्ते अधिक असल्याचा फटका ग्राहकांना बसत तर नाही आहे ना! असे ग्राहकांकडून बोलले जात आहे. एकंदर सर्वांकडेच फोरजी सेवेचेच स्मार्ट फोन आहेत. फोर-जी सेवा अस्तित्वात असताना सुद्धा टू-जी सारखी सेवा मिळत असल्याने ग्राहकांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. फोन करताना नॉट रिचेबल, नो नेटवर्क, कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर.... असे संदेश येत असल्यामुळे कमालीचा मनस्ताप नागरिकांना होत आहे. ही समस्या नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) सावरगाव, वाढोणा, किटाळी, ऊश्राळ मेंढा मिंडाळा, बाळापूर, कन्हाळगाव, गिरगांव, आलेवाही आदी परिसरात कित्येक महिन्यांपासून कायम आहे.
कंपनीने ग्राहकांची समस्या मार्गी लावावी ग्राहकांनी चांगली सेवा मिळावी म्हणून जिओ नेटवर्कला पसंती दिली. अधिक पैसे मोजून रिचार्ज करवून घेतला. अलीकडे पुन्हा कंपनीने रिचार्जचे दर वाढविले आहेत. मात्र त्याप्रमाणे योग्य सेवा मिळत नसल्यामुळे जिओ कंपनीविरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे. जिओ कंपनीने ही समस्या मार्गी लावावी अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.