चंद्रपूर : कोरोना संकटामुळे प्रत्येकजण दहशतीत आहे. दरम्यान, लाॅकडाऊनमुळे राज्य सरकारने सकाळी ११ वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तुूची दुकाने सुरु ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानांमध्ये या वेळात गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दुकानातील गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नवा आदेश काढला असून यानुसार सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली. मागील दोन महिन्यापासून कोरोना संकट घोंगावत आहे. यासाठी राज्य सरकारने लाॅकडाऊन सुरू केला आहे. दरम्यान, याला मुदतवाढही देण्यात आली. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जीवनावश्यक साहित्याचे दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. या वेळेत नागरिक साहित्याची खरेदी करीत आहे. दरम्यान, स्वस्त धान्य दुकानात या वेळेमध्ये धान्य उचलण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची गर्दी होत होती. गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी नवा आदेश जारी करून स्वस्त धान्य दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. यामुळे लाभार्थ्यांसह स्वस्त धान्य दुकानदारांनाही दिलासा मिळाला आहे.
स्वस्त धान्य दुकाने राहणार ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:29 AM