घनश्याम नवघडे
नागभीड : सरकारी गोदामातून उचल केलेल्या धान्याच्या प्रत्येक पोत्यातून किमान दोन किलो धान्य कमी येत असल्याची धान्य दुकानदारांची ओरड आहे. या प्रकाराने तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार चांगलेच त्रस्त झाले आहेत. मात्र, यंत्रणेकडून यावर कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप आहे.
शासनाकडून गरीब व निर्धन लोकांसाठी स्वस्त दरात तसेच काही लोकांना मोफत धान्याचा पुरवठा करण्यात येतो. गावागावांत नेमणूक केलेल्या स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून या धान्याचा पुरवठा होतो. तालुक्यात अशा ११८ स्वस्त धान्य दुकानदारांची नेमणूक केली असल्याची माहिती आहे. नागभीड तालुक्यात ३१ हजार ८३५ कार्डधारक आहेत. यातील २८ हजार ३३८ कार्डधारकांना शासनाकडून अन्नधान्न्याचा पुरवठा होत आहे. नागभीड तालुक्याचा विचार करता नागभीड तालुक्यात अंत्योदय योजनेचे ९ हजार ३३२ लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना १५ किलो गहू, २० किलो तांदूळ आणि १ किलो साखर देण्यात येत आहे. गहू २ रुपये, प्रती किलो, तांदूळ ५ रुपये तर साखर २० रुपये किलो असे याचे दर आहेत.
धान्य वितरण प्रणालीत प्राधान्य गट हा दुसरा गट आहे. यात १९ हजार ६ लाभधारक आहेत. यात घरातील सदस्य सदस्यसंख्या लक्षात घेऊन धान्य देण्यात येते. या योजनेत एका व्यक्तीस ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ अशा ५ किलो धान्यांचा समावेश आहे. कोणतेही धान्य न मिळणारे तालुक्यात ३ हजार ४९७ कार्डधारक आहेत, अशी माहिती आहे.
या स्वस्त धान्य दुकानदारांना धान्याचा पुरवठा शासकीय गोदामातून पोत्यांच्या माध्यमातून करण्यात येतो. तत्पूर्वी पुरवठादार हे धान्य शासकीय गोदामांमध्ये पोत्यांद्वारे जमा करीत असतात. ही पोती कधी फाटलेली असतात. अशा फाटलेल्या पोत्यांमधील धान्य किमान तीन ते साडेतीन किलो कमी असते. पण चांगल्या पोत्यांमधील धान्य दोन किलोंच्या आसपास कमी असते, अशी ओरड स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये आहे. ही बाब स्वस्त धान्य दुकानदार संबंधितांच्या निदर्शनास आणून देतात. पण याकडे मुद्दाम काणाडोळा करण्यात येतो. मात्र या प्रकाराने स्वस्त धान्य दुकानदारांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.