राजेश मडावी
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात कोअर वन पर्यटनासाठी ४० हजार रुपये शुल्क आकारून एका एजंटाने बफर क्षेत्रात फिरवून अकोला येथील चार पर्यटकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पर्यटकांनी या प्रकरणाची तक्रार ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्याकडे केल्यानंतर ताडोबा व्यवस्थापनाने चौकशी सुरू केली आहे.
अकोला येथील प्रवीण जगन्नाथ कुचर, अभिजीत नंदकिशोर मुळे, प्रवीण अनंत सावळे, कुणाल पंजाबराव काळे आणि अन्य एक अशा पाच मित्रांची अमृत नाईक याने ४० हजार रुपयांनी फसवणूक केली. ते २९ व ३० मे रोजी ताडोबात पर्यटनासाठी आले होते. गाभा क्षेत्रात पर्यटनासाठी त्यांनी अमृत नाईक यांच्याकडून नोंदणी केली होती. यासाठी एजंट नाईक यांना ‘गुगल पे’द्वारे २० हजार, १२ हजार व एक हजार आणि रोख सात हजार रुपये, असे एकूण ४० हजार रुपये देण्यात आले. याची पावती नाईक यांनी पर्यटकांना दिली नाही. ४० हजार रुपयांमध्ये कोलारा गेटमधून ताडोबा गाभा क्षेत्रात दोन वनफेरी ठरवण्यात आल्या होत्या. मात्र, नाईक यांनी कोलारा गेटपासून ४ कि.मी. अंतरावरील निमढेला प्रवेशद्वार येथे आणून सोडले. तेथे चौकशी केली असता हे गाभा क्षेत्र नसून बफर क्षेत्र असल्याचे लक्षात आले, अशी माहिती पर्यटकांनी दिली. यानंतर नाईकने दुसऱ्या दिवशीही गाभा क्षेत्राऐवजी बेलारा प्रवेशद्वारातून पुन्हा बफर सफारी घडवून आणली. दोन्ही ठिकाणी गेट पास किंवा बफर सफारीची पावती देण्यात आली नाही, अशी तक्रार प्रवीण कुचर, अभिजित मुळे, प्रवीण सावळे, कुणाल काळे आदींनी क्षेत्रसंचालकांकडे केली आहे.
ताडोबा कोअर क्षेत्रातील सफारीच्या नावावर ४० हजारांनी गंडविल्याची तक्रार पर्यटकांनी केली. याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आली. तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.-महेश खोरे, तपास अधिकारी, ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प