नागभीड: तपाळ योजनेत तांत्रीक बिघाड निर्माण झाल्यामुळे नागभीडसह ११ गावांचा पाणी पुरवठा गेल्या चार दिवसांपासून बंद असून हा बिघाड दूर करुन पाणी पुरवठा पूर्ववत करावा, अशी या गावातील नागरिकांची मागणी आहे.१९९९ ला कार्यान्वीत झालेल्या या तपाळ योजनेच्या माध्यमातून ब्रह्मपुरी तालुक्यातील तपाळ, बेलगाव, तोरगाव (खुर्द) तोरगाव (बुज) तर नागभीड तालुक्यातील नागभीड, नवखळा, चिखलपरसोडा, चिकमारा, बाळापूर आणि मौशी या गावांना पाणी पुरवठा होतो. एक वर्षाअगोदर या योजनेद्वारा नागभीड व इतर गावांना व्यवस्थित पाणी पुरवठा होत होता. मात्र मागील वर्षीपासून या योजनेचा चांगलाच त्रास वाढला आहे. प्रत्येक महिन्यात काही ना काही दोष उद्भवतो आणि नागरिकांना प्रत्यके महिन्यात तीन तीन दिवस पाण्यापासून वंचित राहावे लागते. मागील वर्षी तर भर उन्हाळ्यात सतत हप्ताभर पाणी पुरवठा बंद पडल्याने येथील नगरपरिषदेच्या प्रशासकांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करावा लागला होता. त्यानंतरही ही योजना अनेकदा बंद पडली.आता पुन्हा गेल्या चार दिवसांपासून ही योजना बंद आहे. सूर्य डोक्यावर आला असल्याने अंगाची लाही होत आहे. परिणामी पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. नेमक्या याच वेळेस तपाळ योजना बंद पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. केवळ नागभीडच नाही तर या योजनेत समावेश असलेल्या नवखळा, चिखलपरसोडी, चिकमारा, देवटेक, बाळापूर, मौशी, तोरगाव (खुर्द), तोरगाव (बुज.) तपाळ येथील नागरिकांनाही पाण्यासाठी कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
तपाळ योजना चार दिवसांपासून बंद; नागरिकांची भटकंती
By admin | Published: April 10, 2017 12:44 AM