शेतीही बाधित : अधिकाऱ्यांनी तक्रार घेण्यास दिला नकार
अमोद गौरकर
शंकरपूर : येथून जवळच असलेल्या कोलारी येथील नदीमध्ये कंपनीने रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे हजारो मासोळ्यांचा तथा जलचर प्राण्यांचा मृत्यू झाला. तसेच चार शेतकऱ्यांची धानशेती बाधित झालेली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र याची तक्रार घेण्यास चिमूर तालुक्यातील एकही अधिकारी तयार नाही. त्यामुळे शेतकरी हतबल बनले आहेत.
कोलारी येथे सीऑन ॲग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही सोयाबीन तेल बनविणारी कंपनी आहे. कोलारी ते मेंढेगाव या रस्त्यावर कंपनीस्थित असून या कंपनीच्या बाजूला कोलारी नदी वाहते. या नदीमध्ये या कंपनीचे रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे हजारो मासोळ्यांचा व इतर जलचर प्राण्यांचा मृत्यू झालेला आहे. तसेच चार शेतकऱ्यांची शेती बाधित झालेली आहे. या कोलारी नदीवर दोन कंपन्या स्थित असून या कंपन्यांचे पाणी या नदीला सोडण्यात येते. ही नदी बारमाही असून समोर जाऊन वैनगंगा या मोठ्या नदीला जोडली जाते. सीऑन कंपनीने रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे पाणी प्रदूषित झालेले असून संपूर्ण नदीचे पाणी हे पांढरे झालेले आहे. तसेच या पाण्यावर रसायनयुक्त साय तरंगताना दिसत आहे. त्यामुळे या पाण्यात असलेले जलचर प्राणी मृत्युमुखी पडलेले आहे. हे पाणी आता गुराढोरांना पिण्यासाठी उपयुक्त राहिलेले नाही.
बॉक्स
पिकांचे सिंचन कसे करणार?
या नदीवर शेकडो शेतकरी अवलंबून असून या नदीचे पाणी शेतीपिकाला देण्यात येते. परंतु हे रसायनयुक्त पाणी असल्यामुळे आता शेतीपिकालाही पाणी शेतकरी देऊ शकत नाहीत. यात प्रामुख्याने सागर दिलीप गावंडे, बाबा श्रीकृष्ण गावंडे, दुर्वेश पुंडलिक गावंडे व इतर शेतकऱ्यांच्या धानशेतीत हे रसायनयुक्त पाणी गेल्यामुळे पूर्ण धानपीक नष्ट झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांची हजारो रुपयांची पिके नष्ट झाल्यामुळे ते आर्थिक विवंचनेत आहेत. याबाबत शेतकरी कंपनीकडे तक्रार दाखल करण्यास गेले असता त्यांनी तक्रार घेण्यास नकार दिला. यासोबतच शंकरपूर येथील पोलीस चौकी, चिमूर येथील तहसीलदार यांनीसुद्धा ही तक्रार घेतलेली नाही. याबाबत मात्र कृषी विभागाने तक्रार दाखल करून घेतलेली आहे.
कोट
कंपनीमध्ये जलशुद्धीकरण यंत्र बसविले असून पाणी शुद्ध करूनच प्रथम आम्ही आमच्या जमिनीवर सोडत असतो आणि त्यानंतर हे पाणी नदीमध्ये जात असते. पाऊस आल्याने थोडेफार काही रासायनिक अंश गेले असल्याने मासोळ्यांचा व इतर जलचर प्राण्यांचा मृत्यू झाला असावा. सुधारणा करून शुद्ध पाणी नदीला कसे जाईल, याचा प्रयत्न करणार आहे.
- एस. एन. म्हस्के, व्यवस्थापक, सीऑन कंपनी, कोलारी.