पालकमंत्र्यांकडून आढावा : विकासाच्या चंद्रपूर पॅटर्नमध्ये सक्रीय सहभाग नोंदवा मूल : मूल येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ४ एप्रिल रोजी दौरा आयोजित करण्यात आला आहे. ४ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मूल येथील बसस्थानकाचे अत्याधुनिकीकरण व नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन व माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा.सा.कन्नमवार यांच्या स्मारक व सभागृहाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रत्येक विभागाने करायच्या कामाचा आढावा सोमवारी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. मूल येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत सहभागी जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली. विकासाच्या मार्गावर अग्रेसर असलेला चंद्रपूर पॅटर्न आपल्या सर्वांच्या सक्रीय सहभागातून राज्यापुढे ठेवायचा आहे. मूल येथील प्रस्तावित ४ एप्रिलच्या मुख्यमंत्र्यांचा विविध विकास कामांच्या शुभारंभाचा दौरा हा त्याचाच एक भाग आहे. यामध्ये जिल्हयातील सर्व नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. अर्थसंकल्पात समूह शेती करणाऱ्या गटांसाठी आपण भरीव आर्थिक तरतूद केली असून किमान २० शेतकऱ्यांचे गट करुन समूह शेतीच्या माध्यमातून विकास साधा. सिंचन, बी-बियाणे, शेती तंत्रज्ञान यासाठी भरीव मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. चंद्रपूर जिल्हा व्यसनमुक्त, हगणदारीमुक्त आणि रोजगारयुक्त बनविण्याच्या आपल्या संकल्पाचा त्यांनी पुर्नरुच्चार केला. या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाचा आदर्श अन्य जिल्ह्यापुढे उभा करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंद्र सिंह, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी अनेकांची उपस्थिती होते. (तालुका प्रतिनिधी)
मुख्यमंत्री येणार मूलच्या दौऱ्यावर
By admin | Published: March 29, 2017 1:53 AM