चार जणांचा मृत्यू : गावात कोरोना संसर्ग वाढला
मूल : तालुक्यातील चिखली हे गाव मागील काही दिवसांपासून तापाच्या आजाराने हैराण झाले असून, गावातील ७० ते ८० लोकांनी कोरोना तपासणी केली असता, १२ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत, तर १५ दिवसात चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या व्यक्तींमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण एकदम कमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळले. यामुळे उपविभागीय अधिकारी खेडकर यांनी गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
कोरोनाच्या काळात चिखली गावात तापाची साथ मोठ्या प्रमाणात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णसंख्या आणखी वाढण्याची भीती असल्याने व रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून मूलचे उपविभागीय दंडाधिकारी खेडकर यांनी एका आदेशानुसार चिखली हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले असून, गावातील मुख्य मार्गाला सील करण्यात येणार आहे. गावातील मुख्य मार्ग तथा ज्या वस्तीत जास्त रुग्णसंख्या आहे, तो भाग सील करण्यात येणार आहे. गावातील रुग्णांची संख्या लक्षात घेता आरोग्य प्रशासनाने तातडीने गावात आरोग्य शिबिर घेऊन सर्व घरांचे सर्वेक्षण करून ज्या घरात तापाचे रुग्ण वा इतर आजारांचे रुग्ण असल्यास त्यांची आरोग्य तपासणी करून गंभीर रुग्णाला तालुक्याच्या ठिकाणी नेऊन उपचार करण्यात यावेत. सामान्य रुग्णांना गावातच ग्रामपंचायतीने तयार केलेल्या शाळेतील विलगीकरणामध्ये ठेवण्यात यावे, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. शासकीय अधिकाऱ्यांना शासनाच्या आदेशानुसार गावातच राहण्याच्या सूचना असतानासुद्धा चिखली येथील अधिकारी तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणावरून रोज ये-जा करीत असतात. त्यामुळे शासनाने कामात दिरंगाई करण्याच्या कारणामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा गावातील नागरिकांकडून होत आहे.
गावातील मुख्य मार्ग सील होत असल्याने बाहेरगावच्या नागरिकांना येथे प्रवेशबंदी असणार आहे.