सिंदेवाही : पोलीस गस्तीवर असताना सुगंधित तंबाखू घेऊन जाणारा ट्रक सिंदेवाही पोलिसांनी पकडला. या ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये ३ लाख ३६ हजाराचा सुगंधित तंबाखू आढळून आला. याप्रकरणी ट्रक चालक रोहित दिवाकर घंटावार (३२) रा. राजोली ता. मूल याला अटक केली आहे.
रोहित घंटावार एमएच ४० एटी ०७५१ क्रमांकाच्या ट्रकने नागपूरहून सुगंधित तंबाखू घेऊन मूलकडे जात होता. मात्र वाटेतच तो पकडला गेल्याने अवैधरीत्या मूलमध्ये तंबाखूची साठवणूक आणि विक्री करणाऱ्याचा चांगलाच फटका बसला आहे. ही कारवाई सिंदेवाहीचे ठाणेदार योगेश घारे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. अधिक तपास ठाणेदार घारे व पोलीस उपनिरीक्षक अमर सुरवसे करीत आहेत.
मूलचा ‘तो’ तंबाखूचा व्यापारी कोण?
ट्रकद्वारे सुगंधित तंबाखूची मूलमध्ये तस्कारी होत असताना ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सिंदेवाहीचे ठाणेदार योगेश घारे यांनी दिली. मात्र हा तंबाखू मूल येथील कोणत्या तंबाखू व्यापाऱ्याकडे जात होता, ही बाब उघड केली नाही. या प्रकरणात अटक केलेला आरोपी हा मूल तालुक्यातील राजोली येथील आहे. याचाच अर्थ हा सुगंधित तंबाखूही मूल तालुक्यातील अवैधरीत्या सुगंधित तंबाखूचा व्यवसाय करणारा व्यापारीही मूलचा आहे. हे लक्षात येणारे आहे. तो कोण आहे. हे पोलीस उघड करतील, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.