ब्रम्हपुरी : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वांचे नुकसान झाले असून वैज्ञानिकांनी तिसऱ्या लाटेत बालकांना धाेका वर्तविला आहे. आजचे बालक हे उद्याचे भविष्य असल्याने त्यांचे काेराेनापासून संरक्षण व्हावे, यासाठी त्यांना काेराेना प्रतिबंधक लस देण्याची घोषणा करावी व हा संपूर्ण खर्च केंद्र सरकारने करावा, यासाठी कृतिसंसाधन समिती ब्रह्मपुरी यशवंतराव खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी मार्फत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच निवेदन पाठविण्यात आले.
यावेळी काेराेना रुग्णांवर आयुर्वेदिक उपचारपद्धतीसुद्धा वापरता यावी, ग्रामीण भागातील डाॅक्टरांचा ग्रामपंचायतीद्वारा विशेष सत्कार करावा, अशा मागण्याही करण्यात आल्या. निवेदन देतेवेळी शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष यशवंतराव खोब्रागडे, ॲड. क्षितीज मेंढे, पद्माकर रामटेके, उमेश बागडे, माेतीलाल देशमुख, स्वप्निल रामटेके, अनिल उंदिरवाडे, राजेंद्र माेटघरे उपस्थित होते.