फोटो
चिमूर : कोरोनाने मानवी जीवनाचे जीवनचक्र बदलविले. त्यामुळे खानपान, व्यायाम, योगा याला खूप महत्त्व आले आहे. "आपले आरोग्य आपल्या हाती" या तत्त्वाला अनुसरून चिमूर उपविभागीय पोलीस विभाग, एसएमएस कन्स्ट्रक्शन, एसआरके कन्स्ट्रक्शन व रोटरी क्लब चिमूरच्यावतीने रविवारी खुली मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांपासून वयोवृद्धही धावले.
चिमूर पोलीस उपविभाग, एसएमएस कन्स्ट्रक्शन, एसआरके कन्स्ट्रक्शन प्रा. लि. तसेच चिमूर रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने चिमूर येथे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये चिमूर शहर, तालुका, यासह चंद्रपूर नागपूर, वर्धा, भंडारा जिल्ह्यातील सुमारे ७०० ते ८०० स्पर्धक, तरुण, तरुणी, शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांनी हिरहिरीने भाग घेतला.
सदर स्पर्धेस चिमूर उपविभागीय स्तरावरील विविध शासकीय आस्थापनांचे अधिकारी व कर्मचारीवृंद यांनी सहभाग घेतला. शालेय विद्यार्थांपासून पंचाहत्तरी गाठलेल्या वयोवृध्दापर्यंत स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला.
मागील एक वर्षापासून संपूर्ण विश्व हे कोरोना महामारीच्या संकटातून जात आहे. यात अनेक शासकीय आस्थापना, स्वयंसेवी संस्था, विशेषत: पोलीस विभागाने कोरोना योध्दा म्हणून मोलाची भूमिका पार पाडली. याच संकल्पनेतून “आपले आरोग्य आपल्या हाती” तसेच “माझे कुटुंब माझी जबाबदारी” या तत्त्वाला अनुसरुन “रन फॉर कोरोना वारियर्स” या ध्येयाने प्रेरित होऊन चिमूर उपविभागीय पोलीस अधिकारी (भापोसे) नितीन बगाटे यांच्या पुढाकाराने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन चिमूर उपविभाग पोलीस कार्यालयामार्फत करण्यात आले.
या स्पर्धेकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे , भिसीचे पोलीस निरीक्षक मनोज गभणे, सहायक पोलीस निरीक्षक एस.पी. बोरकुटे, एसआरके कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे श्रेयश लाखे, रोटरी क्लब चिमूर तसेच पोलीस स्टेशन चिमूर येथील सर्व पोलीस अधिकारी, अंमलदारांचे विशेष सहकार्य लाभले.
बॉक्स
मॅरेथॉन स्पर्धेत मुलींमध्ये श्रेया संजय किरमोरे प्रथम, तेजस्विनी नरेंद्र लांबकाटे द्वितीय, आस्ता हेमंत निबाळकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तर मुलांमध्ये लीलाराम बावणे प्रथम, शदाब पठाण द्वितीय, तर ऋतिक पंचबुद्धे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.